गडहिंग्लज पंचायत समितीच्या तिसऱ्या मजल्यासाठी निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:15 AM2021-07-22T04:15:39+5:302021-07-22T04:15:39+5:30
गडहिंग्लज : गडहिंग्लज पंचायत समितीच्या तिसऱ्या मजल्याच्या विस्तारीत इमारतीचे बांधकाम आणि लिफ्टसाठी निधी द्यावा, अशी मागणी येथील ...
गडहिंग्लज :
गडहिंग्लज पंचायत समितीच्या तिसऱ्या मजल्याच्या विस्तारीत इमारतीचे बांधकाम आणि लिफ्टसाठी निधी द्यावा, अशी मागणी येथील पंचायत समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सभापती रूपाली कांबळे, उपसभापती इंदू नाईक, सदस्य विजय पाटील, विद्याधर गुरबे, बनश्री चौगुले, श्रीया कोणकेरी, इराप्पा हसुरी यांनी हे निवेदन दिले. यावेळी आमदार राजेश पाटील हेही उपस्थित होते.
पंचायत समितीच्या नवीन इमारतीमध्ये पुरेशी जागा नसल्यामुळे काही विभाग बाहेर आहेत. त्यामुळे बहूद्देशीय सभागृहासह तिसरा मजला बांधणे आवश्यक आहे. त्यासाठी भरीव निधी मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
चौकट :
रस्त्यांसाठी प्रत्येकी १० लाख द्या
माद्याळ कसबा नूल, शिंदेवाडी, हेब्बाळ जलद्याळ, तेरणी, खणदाळ, उंबरवाडी व अर्जूनवाडी या गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी प्रत्येकाला १ लाखाचा निधी द्यावा, अशी मागणीही पं. स. सदस्यांनी केली आहे.
चौकट : संध्यादेवींचेही साकडे!
स्व. कुपेकर यांच्या प्रयत्नामुळे गडहिंग्लज पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीची उभारणी झाली आहे; परंतु विस्तारीत तिसरा मजला व बहूद्देशीय सभागृहासाठी निधीची गरज आहे. त्यासाठी १ कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनीही लेखी पत्राद्वारे मंत्री मुश्रीफांकडे केली आहे.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना सभापती रूपाली कांबळे यांनी निवेदन दिले. यावेळी आमदार राजेश पाटील, उपसभापती इंदू नाईक, विद्याधर गुरबे व सदस्य उपस्थित होते.
क्रमांक : २१०७२०२१-गड-०२