वीजपुरवठ्यासाठी वाड्यावस्त्यांना निधी
By Admin | Published: March 6, 2016 11:45 PM2016-03-06T23:45:31+5:302016-03-07T00:16:52+5:30
धनंजय महाडिक : एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतून मिळणार १५७ कोटींचा निधी
कोल्हापूर : जिल्ह्यातील वाड्यावस्त्यांना वीजपुरवठा करण्यासाठी दीनदयाळ ग्रामज्योती योजनेतून २६ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. त्याव्यतिरिक्त पथदिवे आणि विद्युत वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतून तब्बल १५७ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर होण्याच्या मार्गावर आहे, असे खासदार महाडिक यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यापासून विद्युतीकरण आणि वीज मंडळाच्या सक्षमीकरणाला प्राधान्य दिले. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी विद्युतीकरणापासून वंचित राहिलेली खेडी, वाड्यावस्त्यांपर्यंत वीज पोहोचविण्यासाठी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना राबविण्याचे निश्चित केले. यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जी गावे आणि वाड्यावस्त्या विजेपासून वंचित आहेत, त्याबद्दलची माहिती घेऊन खासदार महाडिक यांनी या योजनेतून निधी आणण्यासाठी प्रयत्न केले. या योजनेतून जिल्ह्यासाठी २६ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. खासदार महाडिक यांनी सुचविलेल्या कामासाठी हा निधी मंजूर झाला आहे. ज्या ठिकाणी अजूनही वीज पोहोचली नाही, अशा ठिकाणी आवश्यक पायाभूत उभारणी आणि अन्य कामांसाठी हा निधी खर्च करायचा आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील चार हजार ७९४ घरांमध्ये प्रथमच वीज कनेक्शन मिळणार आहे. तसेच २२ वाड्यावस्त्या जिथे विजेचा पत्ताच नव्हता तेथेही विद्युतीकरणाचे जाळे पसरण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील मोठ्या शहरांसाठी एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतून १५७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. या योजनेअंतर्गत नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रातील, सबस्टेशन बांधणी, ११ केव्ही लाईन टाकणे, गंजलेले-वाकलेले पोल बदलणे, लोंबकळणाऱ्या वायरी, नादुरुस्त कपॅसीटर, ट्रान्सफॉर्मर बदलून नवी उपकरणे बसविण्यासाठी हा निधी खर्च करता येणार आहे. त्याव्यतिरिक्त फिडर सेप्रेशन, गार्डिंग दुरुस्ती केली जाणार आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या सर्व कामांसाठी रस्ते उखडल्यानंतर, त्याची दुरुस्ती करण्यासाठीही तरतूद असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.
ज्या ठिकाणी विद्युतीकरण झालेले नाही, लाईट पोहोचलेली नाही, अशा ठिकाणांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. पथदिवे आणि खेड्यांमधील सार्वजनिक ठिकाणांच्या विद्युतीकरणासाठी नियोजन मंडळातून साडेतीन कोटींची तरतूद केल्याचे महाडिक म्हणाले.