वृध्दापकाळ, विधवा, दिव्यांग योजनेचे साडेदहा कोटी आले; दोन वर्षांनी लाभार्थ्यांना मिळणार पैसे
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: January 4, 2025 15:35 IST2025-01-04T15:35:16+5:302025-01-04T15:35:59+5:30
केंद्र शासनाची योजना

वृध्दापकाळ, विधवा, दिव्यांग योजनेचे साडेदहा कोटी आले; दोन वर्षांनी लाभार्थ्यांना मिळणार पैसे
इंदुमती गणेश
कोल्हापूर : केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा, दिव्यांग तसेच कुटुंब लाभ या चार योजनांच्या निधीला तब्बल दोन वर्षांनी मुहूर्त लागला आहे. केंद्राने या योजनांचे १० कोटी ५८ लाख ७६ हजार ६९० रुपये इतका निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला असून तो लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तालुक्यांना पाठवण्यात आला आहे. पुढील चार दिवसांत ही रक्कम लाभार्थ्यांना मिळेल.
दारिद्रय रेषेखालील निराधार व दिव्यांगांसाठी राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी व श्रावणबाळ या दोन योजना चालवल्या जातात. तर केंद्राच्या वतीने इंदिरा गांधी वृद्धापकाळ, इंदिरा गांधी विधवा योजना, इंदिरा गांधी दिव्यांग या योजनांसाठी निधी दिला जातो. या दोन्ही योजनांच्या समन्वयातून राज्य शासनाचे १३०० रुपये व केंद्र शासनाचे २०० रुपये असे प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा १५०० रुपयांचे अनुदान दिले जाते. राज्य शासनाच्या योजनांचा निधी दर महिन्याला नियमित येतो, मात्र गेल्या दोन वर्षांपासून केंद्र शासनाच्या योजनांचा निधी रखडला होता. लाभार्थ्यांना फक्त १३०० रुपयेच मिळत होते.
वयोवृद्ध, निराधार नागरिकांकडून सातत्याने या योजनेच्या निधीसाठी पाठपुरावा केला जात होता. अखेर मागील आठवड्यात केंद्र शासनाने आजवर रखडलेल्या सर्व योजनांची रक्कम राज्याकडे व राज्याने ती जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केली आहे. ही रक्कम जिल्हा प्रशासनाने तालुक्याला वर्ग केली असून पुढील आठवड्यापासून ती लाभार्थ्यांच्या खात्यावर मिळायला सुरू होईल.
केंद्राच्या योजना : लाभार्थी संख्या : अनुदानाची रक्कम
- इंदिरा गांधी वृद्धापकाळ : २२हजार ७५८ : ९ कोटी ३८ लाख ५६ हजार ६९०
- इंदिरा गांधी विधवा योजना : ३ हजार २० : ७९ लाख ७८ हजार ५००
- इंदिरा गांधी दिव्यांग योजना : १५० : १२ लाख ८१ हजार ५००
कुटुंब लाभ याेजनेचा १३७ जणांना लाभ
केंद्र शासनाची कुटुंब लाभ ही योजना पूर्वीपासून चालत आलेली असली तरी त्याचा फारसा प्रचार-प्रसार झालेला नाही. या योजनेते कुटुंबातील कर्ती पुरुष किंवा महिलेचा मृत्यू झाला तर वारसांना एकरकमी २० हजार रुपयांचा लाभ दिला जातो. जिल्ह्यातील १३७ कुुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. ही रक्कम २७ लाख ६० हजार इतकी आहे.