‘जलयुक्त’साठी इच्छूक गावांनाही निधी : चंद्रकांतदादा पाटील
By admin | Published: May 2, 2017 04:58 PM2017-05-02T16:58:07+5:302017-05-02T16:58:07+5:30
१ आॅगस्टपासून डिजिटर सात बारा
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0२ : मी राज्याचा मंत्री असलो तरी माझ्या जिल्ह्याकडे माझे विशेष लक्ष आहे. त्यामुळेच ‘जलयुक्त शिवार’ मध्ये जरी निकषांप्रमाणे १८ गावांची निवड झाली असली तरी यामध्ये सहभागी होवू इच्छिणाऱ्या गावांना आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. राज्यातील शेतकऱ्यांना येत्या १ आॅगस्ट पासून डिजिटल स्वाक्षरीने सात बारा उतारे देण्याचा संकल्प असून यापुढे तो मोबाईलवरही उपलब्ध होतील असेही त्यांनी जाहीर केले.
महाराष्ट्र स्थापनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शाहु स्टेडियम येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर हसीन फरास, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कायर्कारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक महादेव तांबडे, नवनियुक्त पोलीस अधिक्षक संजय मोहिते, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत गायन व परेड संचलन करण्यात आले. परेड संचलनात विविध विभागांची पथके सहभागी झाली होती. याबरोबरच शालेय मुला-मुलींनी समुहगान सादर केले.
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री म्हणाले, देशात महाराष्ट्र सध्या दुसऱ्या क्रमांकावर असून येत्या काळात प्रथम क्रमांकासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. ‘जलयुक्त’साठी काही निकष आहेत. त्यातून जिल्ह्यातील १८ गावे निवडली आहेत. मात्र जयांना लोकसहभागातून या योजनेअंतर्गत काम करायचे आहे. अशा जिल्ह्यातील सर्व गावांना कोणत्याही परिस्थितीत निधी दिला जाईल.
डिजिटल सात बारा उतारे देण्यासाठी १ मे पासून चावडी वाचनाची विशेष मोहिम राबविली जात असून यामध्ये काही चूका आणि आक्षेप आढळल्यास दुरुस्त करुन अचूक संगणिकृत डिजिटल स्वाक्षरीने १ आॅगस्टपासून उतारे दिले जातील असे त्यांनी सांगितले. यावेळी लष्करी अधिकारी, जयेष्ठ स्वातंत्र्यसैनिक, अन्य अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दलित मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. बी. सोनार यांनी केले.
पालकमंत्री म्हणाले.....
-राज्यात ६८ हजार कोटींची गुंतवणूक
जलयुक्त शिवार मुळे गतवर्षी ४0 हजार कोटीं रुपयांनी शेती उत्पन्न वाढले आहे. यंदा ८0 हजार कोटींपर्यंत वाढ अपेक्षित
-शेतीचा उणे विकासदर होता. सध्या तो १२ टक्के पर्यंत आणण्यात आला. तो २0 टक्क्यापर्यंत वाढविण्याचा संकल्प.
- जिल्हा वार्षिक योजेतून गतवर्षी ३२0 कोटी खर्च केले असून यंदा ३६५ कोटींचा आराखडा
- जिल्हयातील ७४ गावे आणि १0१ वाड्यांसाठी १ कोटी ३0 लाख ७३ हजाराचा पाणी टंचाई निवारण कृती आराखडा तयार
- जिल्ह्यात रस्ते विकासाची दोन वर्षांत ६३९ कोटी रुपयांची कामे मंजूर. यापैकी ३२९ कामे पुर्ण. चालु वर्षासाठी ३५५कोटी ७९ लाखाची ८१ कामे मंजूर. दोन वर्षात ५६८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे रूंदीकरण
-प्रधानमंत्री मुद्रा योजतून २७ हजार जणांना २७२ कोटींचे कर्जवितरण
विविध पुरस्कारांचे वितरण
यावेळी पोलीस महासंचालक मुंबई यांचे सन्मानचिन्ह पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी आणि कमर्चाऱ्यांचा, जिल्हा क्रिडा पुरस्कार विजेते तसेच राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूचा सत्कार करण्यात आला. तसेच तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कारार्थी गावांचा, बाल शल्य चिकित्सक, आदर्श तलाठी, होमगार्ड जवान, जिल्हा लघु उद्योग पुरस्कार, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेअंतर्गत समृध्द महाराष्ट्र जलकल्याण योजनेतील गावे, व्हाईट आर्मी जवान आणि सामाजिक कार्य करणाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कोल्हापूर जिल्हा परिषदेचा गौरव
कोल्हापूर जिल्हा परिषदेने यंदा स्मार्टग्राम योजनाही प्रभावीपणे राबविली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कायापालट अभियानांतर्गत तब्बल दोन कोटी रुपयांची विकास कामे झाली आहेत. या योजनेचे यश पाहून ही योजना राज्यात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे अशा शब्दात पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेचा गौरव केला.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत उपविभागीय अधिकारी राधानगरी कागल उपविभागच्या मनिषा कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसंचालक (माहिती) सतीश लळीत, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, कागलच्या उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर यांच्यासह मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध शासकीय कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी, कमर्चारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेत अध्यक्षा महाडिक यांच्या हस्ते ध्वजारोहण
जिल्हा परिषद मुख्यालयाच्या प्रांगणात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कायर्कारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, शिक्षण व अर्थ समिती सभापती अंबरीषसिंह घाटगे, समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, प्रकल्प संचालक हरीष जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुले यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी व जिल्हा परिषदेचे सदस्य, सर्व विभागाचे खाते प्रमुख, कलामंच कमर्चारी व सर्व कमर्चारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह महसूल विभागाचे अन्य अधिकारी व कमर्चारी उपस्थित होते..