पंचगंगा स्मशानभूमीत ३६ कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:22 AM2021-04-26T04:22:10+5:302021-04-26T04:22:10+5:30
कोल्हापूर : कोविड रुग्णांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत चालले असून, शनिवारी रात्री आठ वाजल्यापासून रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत पंचगंगा ...
कोल्हापूर : कोविड रुग्णांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत चालले असून, शनिवारी रात्री आठ वाजल्यापासून रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत पंचगंगा स्मशानभूमीत कोविडमुळे मृत झालेल्या तब्बल ३६ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अलीकडच्या काळातील हा सर्वाधिक आकडा आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेरील रुग्णसुद्धा कोल्हापुरात उपचारास येत आहेत. त्यामुळे कोविड रुग्णांची तसेच मृतांची संख्याही वाढत आहे. जशी मृतांची संख्या वाढेल तसे पंचगंगा स्मशानभूमीतील वातावरण गंभीर बनले आहे. अशा धीरगंभीर वातावरणातही महापालिका कर्मचारी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहेत.
कोविडमुळे शनिवारी (दि. २४) रात्री आठ ते रविवारी रात्री आठ या वेळेत स्मशानभूमीत ३६ मृतदेह आणण्यात आले. त्यांपैकी २२ मृतदेहांवर शनिवारी रात्रीच अंत्यसंस्कार केले. त्यामुळे शनिवारची रात्री ही स्मशानभूमीतील धगधगत राहिली. महापालिकेच्या शववाहिकेबरोबरच खासगी रुग्णवाहिकांतूनही मृतदेह स्मशानात नेले जात आहेत. अंत्यसंस्कारांसाठी २५ बेड राखीव ठेवले असून ते कमी पडू नयेत म्हणून रक्षाविसर्जनही त्याच दिवशी केले जात आहे. मृत्युसंख्या वाढत चालल्याने त्याचा ताण स्मशानभूमीवर पडला आहे.