कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांवर स्मशानशांततेत अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 07:11 PM2021-04-10T19:11:00+5:302021-04-10T19:12:19+5:30
CoronaVirus Kolhapur : लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत नऊ नियमित मृतदेहांवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत, तर कोरोनाने मृत्यू पावलेल्या पाचजणांचे अंत्यसंस्कार स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनीच केले. माणूस हादरवून टाकणारी स्मशानशांतता तिथे अनुभवण्यास मिळाली.
कोल्हापूर : लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत नऊ नियमित मृतदेहांवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत, तर कोरोनाने मृत्यू पावलेल्या पाचजणांचे अंत्यसंस्कार स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनीच केले. माणूस हादरवून टाकणारी स्मशानशांतता तिथे अनुभवण्यास मिळाली.
लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी शनिवारी रात्री बारा ते दुपारी दोन वाजेपर्यंत पंचगंगा स्मशानभूमीत पाच कोरोनाबाधित मृतदेहांवर गॅसदाहिनीत विना नातेवाइकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी आपलेच नातेवाईक असल्याचे समजून अंत्यसंस्कार केले. नऊ नियमित मृत्यू झालेल्या मृतदेहांवर अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाले.
इतरवेळी स्मशानभूमीत एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक, मित्रमंडळी, सगेसोयरे मोठ्या संख्येने उपस्थित असतात. मात्र, लॉकडाऊन आणि कोरोनाच्या नियमावलीचे पालन करीत शनिवारी मात्र अगदीच नगण्य मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाल्याचे चित्र होते. त्यामुळे स्मशानभूमी असली तरी या स्मशानभूमीत वर्दळ असते. मात्र, शनिवारी दिवसभर अगदीच शब्दाप्रमाणे स्मशानशांतता होती.