महाड दुर्घटनेतील कांबळे यांच्यावर अंत्यसंस्कार

By Admin | Published: August 5, 2016 01:19 AM2016-08-05T01:19:42+5:302016-08-05T01:59:29+5:30

सावर्डेवर शोककळा : बेपत्ता मुलाकडे लक्ष

Funeral on Kamble, the Mahad crashed | महाड दुर्घटनेतील कांबळे यांच्यावर अंत्यसंस्कार

महाड दुर्घटनेतील कांबळे यांच्यावर अंत्यसंस्कार

googlenewsNext

कुंभोज : रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या अपघातात वाहून गेलेले एस.टी. चालक श्रीकांत शामराव कांबळे यांच्यावर हातकणंगले तालुक्यातील सावर्डे गावी गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तथापि, त्यांचा बेपत्ता मुलगा महेंद्र याचा अद्यापही शोध न लागल्याने गावावर शोककळा पसरलेली आहे.
एस.टी. चालक श्रीकांत कांबळे व त्यांच्या मुलाच्या अपघाताची बातमी कळताच सावर्डेतील ५० पेक्षा अधिक नातेवाइकांनी बुधवारी महाड गाठले. तिथे या सर्वांनी रात्र जागून काढली. गुरुवारी पहाटे श्रीकांत यांचा मृतदेह आढळून आला. दुपारी दीड वाजता दापोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात मिळाला. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता सावर्डेतील बौद्धनगराशेजारील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीस पी. टी. कांबळे, संपत कांबळे, गौतम कांबळे, वसंत कांबळे, महेश कांबळे, भागवत कांबळे, बौद्धनगरातील नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.

माझी मुले व्हावीत डॉक्टर... इंजिनिअर...!
श्रीकांत कांबळे स्वत: एस. टी. चालक असताना आपल्या मोठ्या मुलाला त्यांनी इंजिनिअर बनविले, तर लहान महेंद्रला डॉक्टर बनविण्याची इच्छा ते नेहमी नातेवाइकांशी बोलून दाखवीत. त्यांची आठवण सांगताना एका चालकाने पोरांना इंजिनिअर, डॉक्टर बनविण्यासाठी कष्टातून केलेली धडपड सांगताना कुटुंबीयांचा ऊर दाटून येत होता.
माय-लेकाच्या काळजाची चरफड...
श्रीकांत यांच्यावर अंत्यसंस्कार उरकून आलेल्या नातेवाइकांना पाहताच त्यांच्या पत्नी कमल आणि मोठा मुलगा मीलन यांनी केलेल्या आक्रोशाने उपस्थित हेलावून गेले. एकीकडे पतीचा अंत्यविधी, तर दुसरीकडे बेपत्ता मुलाची हुरहुर पाहता या घटनेने माय-लेकांची झालेली केवीलवाणी अवस्था पाहून सर्वजण गलबलले.

Web Title: Funeral on Kamble, the Mahad crashed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.