अमर रहे! जवान अविनाश कागिनकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 01:26 PM2022-06-30T13:26:49+5:302022-06-30T13:45:42+5:30
हिमाचल प्रदेशमध्ये धर्मशाला येथे सैन्यदलात सेवा बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने झाला मृत्यू
हलकर्णी : हिमाचल प्रदेशमध्ये धर्मशाला येथे सैन्यदलात सेवा बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू पावलेले जवान अविनाश आप्पासाहेब कागिनकर यांच्यावर त्यांच्या जन्मगावी नंदनवाड (ता. गडहिंग्लज) येथे बुधवारी (२९) सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतीय सैन्याच्या आर्मी सप्लाय कोअर सेंटरमध्ये त्यांनी ७ वर्षे सेवा बजावली होती.
बुधवारी (२९) सकाळी साडेनऊ वाजता अविनाशचे पार्थिव नंदनवाड स्टॉपवर आणण्यात आले. तेथून ‘भारत माता की जय... अविनाश कागिनकर अमर रहे... अमर रहे...’च्या घोषणांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमधून त्यांची अंत्ययात्रा काढली. गावातील आदिती फौंडेशनचे संस्थापक दिनकर सावेकर यांनी या अंत्यविधीसाठी एक लाखाची देणगी दिली. यावेळी १८५४ कोअर बटालियन धर्मशाला सेंटरचे सुभेदार व्ही. राजेंद्रन, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार दिनेश पारगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शीतल शिसाळ, जिल्हा सैनिक बोर्डाचे चंद्रशेखर पांगे, संतोष पाटील, नागेश चौगुले, विद्याधर गुरबे, रियाज शमनजी, गंगाधर व्हसकोटी, बाळेश नाईक, सरपंच शेवंता मगदूम, भारती रायमाने आदींनी पुष्पचक्र अर्पण करून अविनाश यांना श्रद्धांजली वाहिली.
वडील आप्पासाहेब यांनी जवान मुलाच्या चितेस भडाग्नी दिला. यावेळी आई सुवर्णा, भाऊ वैभव, पत्नी राजलक्ष्मी यांच्यासह नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. यावेळी रेखाताई हत्तरकी, उपसरपंच बाबू केसरकर, तायगोंडा बोगरनाळ, मंडल अधिकारी विजय कामत, ग्रामसेवक दत्ता पाटील, गावातील आजी-माजी सैनिक यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
‘कुंकू’ कायम राहणार
अविनाश यांची पत्नी राजलक्ष्मी यांच्या कपाळावरील कुंकू अबाधित ठेवून गावात ‘विधवा प्रथा’ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. गावातील आजी-माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक व ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्यांनी विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याची घोषणा अविनाश यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी करण्यात आली.
गावातील तिघांना वीरमरण
१९८७ मध्ये शांती सेनेत सेवा बजावत असताना गावचे सुपुत्र नागेश मोरे यांना श्रीलंकेत वीरमरण आले होते. त्यानंतर गावातील भीमगोंडा बोगरनाळ या जवानाचा गोव्यात प्रशिक्षणादरम्यान हृदयविकाराने, तर कागिनकर यांचाही हृदयविकाराने मृत्यू झाला.