कोल्हापुरातील जवान निलेश खोत यांच्यावर अंत्यसंस्कार, दिल्लीत सेवा बजावताना झाला होता मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 04:52 PM2022-11-12T16:52:18+5:302022-11-12T16:52:38+5:30
श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण गाव दिवसभर बंद ठेऊन गावकरी व उपस्थितांनी अखेरचा निरोप देऊन दुखवटा पाळला.
इचलकरंजी : तारदाळ (ता.हातकणंगले) येथील जवान निलेश अशोक खोत (वय ३४) यांच्या पार्थिवावर शुक्रवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातील सन्मती विद्यालयापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी भावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. भारत माता की जय, जवान अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या.
दिल्ली येथे सिग्नल रेजीमेंट रॅँक (एन.के.) येथे सेवा बजावत असताना बुधवारी (दि.९) रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. शुक्रवारी त्यांचे पार्थिव तारदाळात आणले. तेथून अंत्ययात्रेस सुरूवात झाली. तेथून गावातील छत्रपती शिवाजी चौक, गावभाग, चांदणी चौक, शहापूर रोड, समर्थनगर फिरून खोत मळा येथे पोहचली. तेथे लोकप्रतिनिधी, लष्करी, पोलिस अधिकारी व सर्व देशप्रेमी यांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात निलेश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तसेच पोलिस दल व सैन्यदलाच्यावतीने त्यांना मानवंदना दिली. श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण गाव दिवसभर बंद ठेऊन गावकरी व उपस्थितांनी अखेरचा निरोप देऊन दुखवटा पाळला.