‘फाकड्या’वर केले अंत्यसंस्कार, घातले बारावे; ढेरे कुटुंबीयांचा बैलाप्रती ऋणानुबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 01:08 AM2019-03-19T01:08:48+5:302019-03-19T01:09:14+5:30
लहानपणापासूनच प्राणिमात्रांवर प्रेम करा, त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवा, त्यांच्याशी मैत्री जोडा यासारखे संस्कार आपल्यावर होत आहेत. परंतु ‘त्या’ प्राण्याच्या मृत्यूनंतरही त्याच्यावर मानवासारखेच
संजय पारकर ।
राधानगरी : लहानपणापासूनच प्राणिमात्रांवर प्रेम करा, त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवा, त्यांच्याशी मैत्री जोडा यासारखे संस्कार आपल्यावर होत आहेत. परंतु ‘त्या’ प्राण्याच्या मृत्यूनंतरही त्याच्यावर मानवासारखेच अंत्यसंस्कार करावेत, बारावे घालावे, असा नवा संदेश देणारी घटना राधानगरी तालुक्यात सध्या चर्चेचा विषय बनली आहे.आयरेवाडी येथील ढेरे कुटुंबीयाला पंचक्रोशीत मान-प्रतिष्ठा, वाहवा, आर्थिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या ‘फाकड्या’ नावाच्या बैलावर अंत्यसंस्कार केले, बारावा विधी करून त्यांनी ‘फाकड्या’विषयी ऋणानुबंध, आस्था व्यक्त केली आहे.
आयरेवाडीतील प्रगतशील शेतकरी कै. सुरेश हरिभाऊ बचाटे यांनी सांगलीतून वासरू विकत आणले. त्याला ‘फाकड्या’ नावाने संबोधले जाऊ लागले. दोन वर्षांनंतर याची जबाबदारी गणपती ढेरे, विलास ढेरे, श्रीपती ढेरे, आनंदा ढेरे या भावांनी उचलली. त्यांनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्याचे पालन केले व बैलगाडी शर्यतीत जुंपले. ‘फाकड्या’च्या बैलगाडीचा कासरा हा रवींद्र ढेरे, रमेश चांदम, मारुती हावलदार, दत्तात्रय पोवार या चौघांंनीच ओढायचा. १६ वर्षांत ‘फाकड्या’ने तब्बल १०० हून अधिक ट्रॉफींवर कब्जा केला. यात महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातही प्रसिद्ध बैलगाडी शर्यती गाजविल्या आहेत.
ट्रॉफीसोबत मिळणारी रक्कमही मोठी असायची, यातून ढेरे कुटुंबीयांना आर्थिक स्थैर्य लाभले. ‘फाकड्या’चे नावही सर्वदूर पसरून ढेरे कुटुंबाची नवी ओळख निर्माण झाली.या ऋणानुबंधातून ढेरे कुटुंबीयांतील सर्व सदस्यांनी ‘फाकड्या’चे खूप लाड केले. वृद्धापकाळाने त्याचे नुकतचे निधन झाले. त्याला आंघोळ घालून कुटुंबीयांनी व परिसरातील लोकांनी त्याची ओवाळणी केली व दफनविधी पूर्ण केला. त्याचे यथासांग बारावा विधीही पूर्ण केला.या दिवशी तब्बल ६०० लोकांची भोजन व्यवस्था केली होती. बैलगाडी स्पर्धेची हौश असणाऱ्यांनी गावातील चौका-चौकात फाकड्याला श्रद्धांजली वाहणारे डिजिटल बोर्डही लावले आहेत.
आर्थिक विकासात सिंहाचा वाटा
आयरेवाडी येथील ढेरे कुटुंबीयाने २००३ साली धुळगाव (जि. सांगली) येथून ४५ हजार रुपयांना वासरू विकत घेतले. पांढरे शुभ्र, गोंडस डोळे, दिसण्यात, चालण्यात रुबाबदार होता. शिंगे मात्र फाकलेली, यामुळे त्यास ‘फाकड्या’ असे नाव ठेवले. याने १०० हून अधिक बैलगाडी शर्यतींमधील ट्रॉफींवर आपले व मालकाचे नाव कोरले आहे. यातून ढेरे कुटुंबीयांना आर्थिक स्थिरता देण्यात ‘फाकड्या’च्या सिंहाचा वाटा आहे.
वडिलांची इच्छा पूर्ण
कै. शंकर ढेरे यांचे ‘फाकड्या’वर अपार प्रेम. त्यांनी मृत्युपूर्वी त्याला कधीही विकू नका, त्याचा मरेपर्यंत सांभाळ करा, अशी इच्छा व्यक्त केली होती. ही इच्छा पूर्ण केली. तसेच त्याच्यावर विधीवत अंत्यसंस्कार करत त्याचे बारावेही घातले, अशी माहिती गणपती ढेरे यांनी दिली.