रामचंद्र माने यांच्यावर आज अंत्यसंस्कार

By admin | Published: February 1, 2017 12:20 AM2017-02-01T00:20:07+5:302017-02-01T00:20:07+5:30

सैनिकी परंपरा जपलेल्या रामपूरवाडीचा जवान हरपला : पहिल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’मध्ये सहभाग

Funeral on Ramchandra Mane today | रामचंद्र माने यांच्यावर आज अंत्यसंस्कार

रामचंद्र माने यांच्यावर आज अंत्यसंस्कार

Next

लखन घोरपडे --देशिंग --कवठेमहांकाळ शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेले सुमारे शंभर लोकवस्तीचे रामपूरवाडी हे गाव, जवान रामचंद्र शामराव माने यांच्या सीमेवरील बलिदानानंतर सुन्न झाले आहे.
देशसेवा बजावत असताना माने हिमस्खलनात शहीद झाल्याची बातमी सोमवारी गावात समजताच रामपूरवाडीसह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजता लष्करी इतमामात माने यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शंभरावर लोकवस्ती असलेल्या रामपूरवाडीतील २९ सैनिक सध्या देशसेवा बजावत आहेत, तर २७ जण देशसेवा संपवून निवृत्त झाले आहेत. सैनिकी परंपरा असलेल्या या गावातील जिगरबाज जवान रामचंद्र माने शहीद झाल्याने वातावरण भावूक दिसून येत होते.
लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आई सुलाबाई यांनी मोठ्या कष्टातून मोठा मुलगा भानुदास यांना सैन्यात भरती केले. दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या गावात शेती परवडत नसल्याने रामचंद्र २००१ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच कवठेमहांकाळ येथे लष्करात भरती झाले. त्यांच्यापाठोपाठ लहान भाऊ अनिलही सैन्यातच दाखल झाला आणि माने कुटुंबातील तीनही भाऊ देशसेवेत दाखल झाले.
गतवर्षी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये रामचंद्र माने यांचा सहभाग होता. रामचंद्र शहीद झाल्याचे वृत्त येताच संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
थोरले बंधू भानुदास गतवर्षी जुलै महिन्यात निवृत्त झाले आहेत. रामचंद्र दिवाळीदरम्यान गावी येऊन गेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुरेखा, मुले संकेत व रोहन, मोठा भाऊ भानुदास, लहान भाऊ अनिल, आई सुलाबाई असा परिवार आहे.


सकाळी नऊ वाजता अंत्ययात्रा
शहीद जवान रामचंद्र माने यांचे पार्थिव बुधवारी सकाळी सात वाजता लष्कराच्या हेलिकॉप्टरने कवठेमहांकाळ येथे आणण्यात येणार आहे. तेथून सकाळी नऊ वाजता रामपूरवाडी येथे गावी ते आणले जाणार आहे. गावातून सजविलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. घरापासून काही अंतरावर शहीद माने यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार शिल्पा ठोकडे, सैनिक कल्याण निधीचे अध्यक्ष प्रदीप ढोले उपस्थित राहणार आहेत.


मुलांना अधिकारीच बनविणार!शहीद रामचंद्र माने यांचा मुलगा संकेत तिसरीत, तर रोहन पहिलीत आहे. दोघेही सातारा येथील सैनिकी शाळेत शिकत आहेत. मी सैन्यात शिपाई असलो तरी, माझी मुले अधिकारी बनविणार, अशी रामचंद्र यांची जिद्द होती. ती आम्ही पूर्ण करणारच, अशी प्रतिक्रिया त्यांचे भाऊ भानुदास यांनी दिली


फलक उभारून गावकऱ्यांची आदरांजली
जिद्दीच्या जोरावर सैन्यात भरती होऊन देशसेवा बजावत असताना शहीद झालेल्या माने यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘रामचंद्र माने अमर रहे’ असे फलक गावात लावण्यात आले आहेत.

Web Title: Funeral on Ramchandra Mane today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.