धगधगतं शिवार...

By admin | Published: June 1, 2017 11:25 PM2017-06-01T23:25:27+5:302017-06-01T23:25:27+5:30

धगधगतं शिवार...

Furious shiver ... | धगधगतं शिवार...

धगधगतं शिवार...

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जगाचा पोशिंदा जेव्हा उपाशीपोटी रस्त्यावर उतरला, तेव्हा त्याच्या धगधगत्या शिवाराची दाहकता जाणवली सर्वसामान्यांना. गुरुवारी सातारा जिल्ह्यातील बळीराजानंही दिला जोरदार झटका. भाजीविना... दुधाविना. मात्र, दुधाची नासाडी न करण्यावर भर देत दाखविली शेतकऱ्यांनी माणुसकी... तर कुठं भरल्या पिकात सोडलं बांधावरच्या शेळ्यांना. मनावर दगड ठेवत. डबडबत्या पापण्यांमधले थेंब हळुवारपणे पुसत. ‘लोकमत टीम’नं टिपली हिच ती बळीराजाच्या संपाची विलक्षण कहाणी....
घावली रंऽऽ गाडी... हाण त्याला !
कऱ्हाड : शेतकरी संघटनेचं वर्चस्व असलेल्या कऱ्हाड तालुक्यातील ग्रामीण भागात कार्यकर्त्यांनी हा संप भलताच मनावर घेतल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. शेतीचा माल घेऊन चाललेल्या गाड्या दिसल्या की संघटनेचा झेंडा फडकवत हे कार्र्यकर्ते तुटून पडायचे. शिक्षण घेऊनही बेरोजगार असलेल्या या कार्यकर्त्यांनी ‘अस्सल गावरान हिसका’ दाखवायलाही मागंपुढं पाहिलं नाही. अशा कार्यकर्त्यांना हुडकून ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची दिवसभर भलतीच तारांबळ उडाली होती.

मलकापूर : भाजीपाला बाजारात पाठवायचा नाही, याचा निर्धार केलेल्या बळीराजाच्या शिवारातला माल खराब होऊ शकतो, हे ओळखून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पाळीव जनावरांना थेट पिकात सोडलं. कऱ्हाड तालुक्यातील कापील गावचे शेतकरी भाऊसाहेब जाधव यांनी आपल्या शेतात भेंडी पिकविली आहे. गुरुवारी सकाळी त्यांच्या वेळापत्रकानुसार भेंडीची तोड होती. परंतु संपात सहभागी झालेल्या भाऊसाहेबांनी भेंडी न तोडताच तशीच रोपांवर लगडू दिली. त्यानंतर आपल्या शेळ्यांना बिनधास्तपणे भेंडीच्या रानात सोडलं. नेहमी बांधावर चरणाऱ्या शेळ्यांनाही मालकाच्या भूमिकेचं आश्चर्य वाटलं असावं.. कारण एक पाऊल जरी रानात पडलं तरीही बाहेर हाकलणारा मालक आज आपल्याला
चक्क ताज्या भेंडीची पार्टी देतोय, हे
त्यांच्यासाठी धक्कादायकच
होतं.
व्यापारी मात्र हळूच हसला...
सातारा : बळीराजाचा संप पूर्वनियोजित असल्याने ग्रामीण भागातून भाजीपाला आलाच नाही. सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी आलेल्या कृषिमालाचा गुरुवारी लिलाव झाला. मात्र, प्रमाण कमी असल्याने व्यापाऱ्यांनी शिल्लक माल बाहेर काढून चढ्या दराने विक्री केली. आगामी तीन-चार दिवस पुरेल एवढा भाजीचा साठा अनेक व्यापाऱ्यांनी केल्याचे मार्केटमध्ये स्पष्ट झाले.
टोमॅटो विकणाऱ्या एका तरुण व्यापाऱ्याच्या पाठीमागे वेगवेगळ्या भाजीने भरलेले अनेक ट्रे ग्राहकांना दिसून
आले.

संप मिटेस्तोवर पोराबाळांना दूध-तूप खाऊ घालणार हाय..
लोकमत न्यूज नेटवर्क
तांबवे : कऱ्हाड तालुक्यातील तांबवे परिसरात दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त. दिवसभर घाम गाळून गोळा केलेलं दूध रस्त्यावर ओतून देतानाची दृश्यं टी. व्ही. चॅनेल्सवर पाहताना अनेकांना होतंय तीव्र दु:ख. यामुळं संप मिटेपर्यंत आपल्या घरातल्या पोराबाळांना भरपूर दूध, तूप खाऊ घालण्याचा निर्धार केलाय इथल्या शेतकऱ्यांनी.
याबाबत ‘लोकमत’शी बोलताना दूध उत्पादक शेतकरी विकास पवार म्हणाले की, आमच्याकडे दुधाची जनावरे जास्त आहेत. दररोज दहा लिटर दूध घातले जाते. मात्र, संपामुळे दूध घरीच आणले आहे. संपामुळे पोराबाळांस्नी दूध भरपूर खायला मिळेल. दुधापासून पेढे, श्रीखंड, तूप बनवणार आहे.
तसेच तांबवेचे शेतकरी शिवाजी पवार म्हणाले की, आमच्या मागण्या सरकार जोपर्यंत पूर्ण करीत नाही. तोपर्यंत आम्ही संपावर जाणार. सरकार नोकरदारांनी संप केला की लगेच त्यांच्या मागण्या मान्य करतंय आन शेतकऱ्यांस्नी मात्र दाद देत नाही. असं का? शेतामध्ये काहीच पिकलं नाहीतर लोक काय पैका खाणार आहेत व्हयं. आमचा भाजीपाला, फळे, दूध खराब झाले तरी चालेल; पण आम्ही संपात सहभागी होणार.
गुरूवारी सकाळी नेहमीप्रमाणे गावातील दूध संकलन केंद्र उघडण्यात आली खरी. मात्र, गावातील दूध उत्पादक शेतकरी या दूध केंद्राकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे अखेर दूध संकलनवाल्यांनी केंद्र बंद केली.
ज्या शेतकऱ्याच्या घरी जनावरे आहेत. आणि दुधाची जनावरे भरपूर आहेत अशा शेतकऱ्यांनी आज दूध घरी नेऊन त्याचे बासुंदी, पेढे,
श्रीखंड, तूप करणार असल्याचे सांगितले.

Web Title: Furious shiver ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.