जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदल आणखी पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:23 AM2021-03-21T04:23:58+5:302021-03-21T04:23:58+5:30
२ जानेवारीला जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना एक वर्ष झाले. यानंतरच्या पंधरवड्यात सभापतींच्या कार्यकाळाचीही वर्षपूर्ती झाली. यानंतर यशवंतराव चव्हाण ...
२ जानेवारीला जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना एक वर्ष झाले. यानंतरच्या पंधरवड्यात सभापतींच्या कार्यकाळाचीही वर्षपूर्ती झाली. यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम, पालकमंत्री सतेज पाटील यांचे कोरोना पॉझिटिव्ह येणे, मंगळवारी अर्थसंकल्प सादर होणे अशा कारणांनी हा बदल पुढे गेला. अशातच गोकुळची निवडणूक जाहीर होणार असल्याने पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार पी. एन. पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. त्यामुळे आता या दाेघांना जिल्हा परिषदेतील बदलापेक्षा गोकुळची सत्ता महत्त्वाची आहे.
अशातच गोकुळसाठी विरोधी आघाडी करताना महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेलाही सोबत घ्यायचे असल्याने पदाधिकारी बदलाला प्राधान्य देऊन शिवसेना नेत्यांची नाराजी ओढवून घेतली जाणार नाही, अशी एक अटकळ बांधली जात आहे. गोकुळच्या निमित्ताने विरोधी आघाडीने सत्तारूढ संचालकांना सोबत घेत खळबळ उडवून दिल्याने जिल्हा परिषदेच्या बदलात नेते ताकद घालवण्यासाठी उत्सुक नाहीत. म्हणूनच हा बदल पुन्हा टळल्याचे मानले जाते.
चौकट
निवडणूक पुढे गेली तरच
सध्या जिल्हा परिषदेत बदल केला नाही म्हणून फार मोठी नाराजी उद्भवणार नाही, असे चित्र आहे. अगदीच जर कोरोनाच्या कारणामुळे गोकुळची निवडणूक पुढे गेली तरच नेते बदलासाठी लागणारा वेळ देऊन त्याबाबत कार्यवाही करतील असे दिसते.
चौकट
राजारामसाठीही हवी शिवसेना, स्वाभिमानीची मदत
राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत हातकणंगले तालुक्यातील मतदान जास्त आहे. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांना या तालुक्यातून शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मदत हवी आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शिक्षण सभापती प्रवीण यादव आणि स्वाभिमानीच्या डॉ. पदमाराणी पाटील यांना बदलले जाणार नाही, असे दिसते; तसेच गोकुळसाठी सत्यजित पाटील सरूडकर हे सत्तारूढांना सोडून पालकमंत्र्यांकडे आल्याने बांधकाम समिती सभापती हंबीरराव पाटील यांनाही अभय मिळण्याची शक्यता आहे. अशा कारणांना पदाधिकारी बदल पुढेच जाणार असल्याचे संकेत आहेत.