वडगावातील बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:24 AM2021-05-06T04:24:51+5:302021-05-06T04:24:51+5:30
जिल्ह्यात लाॅकडाऊन होणार या भीतीने आज बाजारपेठेत मोठी झुंबड उडाली होती. वाणी पेठत किराणा माल खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली ...
जिल्ह्यात लाॅकडाऊन होणार या भीतीने आज बाजारपेठेत मोठी झुंबड उडाली होती. वाणी पेठत किराणा माल खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली होती, तर धान्य लाइन ते नुक्कड काॅर्नरपर्यंत बॅरिकेडस् लावून भाजीपाला व इतर खरेदीसाठी गर्दी झाली होती. मात्र, ११ वाजेपर्यंत गर्दीचा उच्चांक वडगावात झाला होता, तर जनता बाजारमध्ये खरेदीसाठी रांगाच लागल्या होत्या. येथील कर्मचारी ग्राहकांना अरेरावी करत होते.
दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारीपद रिक्त होते. त्यामुळे प्रशासनावर वचक कमी झाला होता. त्यामुळे बाजारपेठेत अपवादानेच कारवाई होत होती. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई हे हजर झाले. त्यांनी याबाबत प्रशासन अॅक्शन मोडवर असून, याबाबत कारवाई करण्यासाठी पथके नेमली आहेत. फिजिकल डिस्टन्सिंग, वेळेत अत्यावश्यक सेवेतील दुकाने बंद करावीत, तसेच विनामास्क, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. शहरातील लसीकरण १०० टक्के करण्यासाठी नियोजन सुरू आहे. प्रशासकीय पातळीवर आठ दिवसांत गतिमानता येईल.