भाजीपाला बाजारांमध्ये पुन्हा सोशल डिस्टन्सचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:25 AM2021-04-24T04:25:29+5:302021-04-24T04:25:29+5:30
इचलकरंजी : राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवार (दि.२२) रात्रीपासून कडक नियमांची घोषणा करण्यात आली आहे. असे ...
इचलकरंजी : राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवार (दि.२२) रात्रीपासून कडक नियमांची घोषणा करण्यात आली आहे. असे असतानाही शुक्रवारी थोरात चौक, विकली मार्केट, राधाकृष्ण टॉकीज परिसर, वडगाव कृषी बाजार समितीमध्ये बाजार भरला. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा पुन्हा फज्जा उडाला. त्यावर प्रशासनाकडून कोणताही वचक नसल्याने उदासीन भूमिका दिसून आली.
अत्यावश्यक सेवेमध्ये सकाळी ७ ते ११ या वेळेत भाजीपाला विक्री करण्यास परवानगी दिली होती. या वेळेमध्ये खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी पोलीस व नगरपालिका कर्मचारी उपस्थित नसल्याचे चित्र दिसत होते. आठवड्यातून भरणारा बाजार ‘जैसे थे’च होता.
दरम्यान, नगरपालिकेच्या वतीने विनाकारण फिरणाऱ्यांवर रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात येत होती. तीही शुक्रवारी बंद असल्याने अनेक नागरिक विनाकारण फिरताना आढळले. त्यामुळे पुन्हा नगरपालिकेच्या ढिसाळ कामकाजाबाबत संताप व्यक्त होत आहे. शहरात आंबा खरेदीसह आइस्क्रीम खाण्यासाठीही नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांनाही जीवनावश्यक म्हणजे काय, याचा अर्थ समजला नाही, अशी भावना सोशल मीडियावरून व्यक्त होत होती. त्याचबरोबर प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त होत होती.