इचलकरंजीत आठवडी बाजारात सोशल डिस्टन्सचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:24 AM2021-04-10T04:24:55+5:302021-04-10T04:24:55+5:30
विकेण्ड लॉकडाऊनचा परिणाम लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : विकेण्ड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शहरातील नगरपालिकेने नेमून दिलेल्या १८ ठिकाणी, तसेच ...
विकेण्ड लॉकडाऊनचा परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : विकेण्ड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शहरातील नगरपालिकेने नेमून दिलेल्या १८ ठिकाणी, तसेच रद्द केलेल्या नियमित ठिकाणीही बाजार भरला. बाजारात कोरोनाची तमा न बाळगता तुडुंब गर्दी झाली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. विक्रेते व नागरिक विनामास्क फिरत असल्याचेही आढळले. दरम्यान, बेकरी, किराणा यासह आवश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठीही दुकानांमध्ये गर्दी झाली होती.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विकेण्ड लॉकडाऊन घोषित केले आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. शनिवार व रविवारी कडकडीत बंद असल्यामुळे शुक्रवारी बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. नियमित आठवडी बाजार भरणाऱ्या ठिकाणी एकत्रित होणारी गर्दी टाळण्यासाठी पालिकेने शहरातील विविध १८ ठिकाणी बाजार भरविण्याचे नियोजन केले. त्याठिकाणी विक्रेत्यांनी सोशल डिस्टन्स ठेवून विक्रीसाठी बसणे व त्या परिसरातील नागरिकांनी नियमांचे पालन करत तेथून भाजीपाला खरेदी करणे, असे नियोजन करणयात आले होते; परंतु त्याचाही शुक्रवारी फज्जा उडाला. नियमित बाजार भरणाऱ्या थोरात चौक व विकली मार्केट येथेही बाजार भरला. कोरोनाचा विसर पडल्याप्रमाणे नागरिकांनी तुडुंब गर्दी करत सर्वच नियमांचा फज्जा उडविला. ही बाब गंभीर असून, यातून प्रशासनाची हतबलता दिसून आली. व्यापाऱ्यांतून याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. अन्य दुकानदारांना कडक बंद व नियम पाळायला भाग पाडण्यात आले असताना जीवनावश्यकच्या नावाखाली सर्वत्र नियमांची पायमल्ली झाली. याला जबाबदार कोण, असा संतप्त सवालही उपस्थित झाला. दरम्यान, रात्री ८ वाजल्यानंतर कडक संचारबंदी सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी दोन तास अधिकच धावपळ उडाली होती.
फोटो ओळी
०९०४२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीत थोरात चौकात नियमित भरणारा आठवडी बाजार रद्द करण्यात आला असतानाही तेथे शुक्रवारी बाजार भरून सोशल डिस्टन्ससह सर्वच नियमांचा फज्जा उडाला. (छाया : उत्तम पाटील)