वेळेच्या नियोजनाने भविष्य उज्ज्वल
By admin | Published: April 16, 2017 12:46 AM2017-04-16T00:46:19+5:302017-04-16T00:46:19+5:30
विश्वास नांगरे-पाटील : प्राथमिक शिक्षण शिष्यवृत्ती व क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण
कोल्हापूर : मोबाईल, इंटरनेट गेम यांमध्ये वेळ न घालविता विद्यार्थ्यांनी दिवसातील वेळेचे नियोजन केल्यास उद्याचे भविष्य उज्ज्वल होईल, असे मत विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केले. महापालिका प्राथमिक शिक्षण समितीतर्फे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे शनिवारी सकाळी पूर्व उच्च प्राथमिक (इ. पाचवी स्तर) शिष्यवृत्ती व आंतरशालेय क्रीडा स्पर्धा बक्षीस समारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर हसिना फरास होत्या.
नांगरे-पाटील म्हणाले, मोबाईल, इंटरनेट या साधनांमुळे आजची पिढी व्यसनाधीन होत आहे. हे आक्रमण थोपवायचे असेल तर दिवसातील तासांचे नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी आजपासूनच तासांचे नियोजन आवश्यक आहे. यात शून्य तास मोबाईल, दोन तास व्यायाम, दोन तासांमधून उत्साह वाढविण्यासाठी ग्रीन टी अर्थात चहा घेणे, काही तास मेंदूला विश्रांती द्यावी. दिवसातून पाच वेळा छोटे जेवण घ्यावे. आठ तास शांत झोप घ्यावी. किमान १० तास अभ्यास अर्थात कष्ट करावेत, असे नियोजन करा. पाचवी ते सातवीपर्यंत सर्वसाधारणपणे १० ते १३ वयोगट असतो. याच काळात मेंंदूच्या पुढच्या भागाचा विकास होत असतो. त्यातून पौगंडावस्था तयार होत असते. त्यामुळे या काळात चांगली पुस्तके वाचा. हेच ब्रेन टॉनिक आहे. पाचवी ते सातवी या काळातील बुद्धिमत्ता चाचणी हीच पुढे स्पर्धा परीक्षांकरिता उपयोगी ठरते.
महापौर फरास म्हणाल्या, आई-वडील, गुरुजनांवर प्रेम करा. कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा वसा घ्या. अभ्यास, खेळ यांतून जीवनात यशस्वी होण्यासाठी नियोजन करा.
आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी महापालिका शाळांच्या पटसंख्या व गुणवत्ता वाढीच्या उपक्रमांना बळ देऊ, असे सांगितले.
प्रभारी शिक्षणाधिकारी प्रतिभा सुर्वे यांनी प्रास्ताविक, तर शिक्षण समिती सभापती अजिंक्य चव्हाण यांनी स्वागत केले. यावेळी सहायक उपायुक्त सचिन खाडे यांच्यासह महापालिकेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत पूर्व उच्च व पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पैकीच्या पैकी गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा सत्कार केला.
यशस्वी विद्यार्थी असे (पूर्व उच्च प्र्राथमिक)
वर्धन धनाजी माळी, प्रथमेश मलकारी आरगे, श्वेता सदानंद बाळेकुंद्र्री (तिघेही टेंबलाईवाडी विद्यामंदिर), अर्शद मुबारक नाकाडे, प्रथमेश राजीव जरग, आर्य राजाराम तळप (तिघेही लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर), संचिता सचिन पाटील, नरेंद्र्र संजय दाभोळकर (दोघे नेहरूनगर विद्यालय), हर्ष पुंडलिक खानापूरकर (ज्योतिर्लिंग विद्यामंदिर), वैभवी राजू सुतार (यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर), तर महापालिकेचे महात्मा फुले विद्यामंदिर, फुलेवाडी (आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत प्रथम), खासगी शाळांमध्ये जीवनकल्याण प्राथमिक शाळा, शुगर मिल यांचा समावेश होता.