Lok Sabha Election 2019 महिलांचा कौल ठरवणार उमेदवारांचे भवितव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:40 PM2019-04-16T23:40:16+5:302019-04-16T23:40:33+5:30
इंदुमती गणेश । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : देशाच्या लोकसंख्येत आणि विकासात बरोबरीचा सहभाग असलेल्या महिला शक्तीचा कौल लोकसभा ...
इंदुमती गणेश ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : देशाच्या लोकसंख्येत आणि विकासात बरोबरीचा सहभाग असलेल्या महिला शक्तीचा कौल लोकसभा निवडणुकीत उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहे. कोल्हापूर मतदार संघात महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे तर हातकणंगले मतदारसंघात बरोबरीच्या तुलनेने महिला मतदार कमी असले तरी स्त्रीशक्तीचा कौल उमेदवारांवर गुलाल उधळणार की नाही हे ठरवणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आता पक्षांचे उमेदवार आणि कार्यकर्ते पायाता भिंगरी लावून प्रचार करत आहेत. मिळालेल्या वेळेत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या प्रचारात महिलांचे प्रश्न, महिला आघाड्या आणि कार्यकर्त्यांना अस्तित्वापुरते स्थान असले तरी मतदार म्हणून त्यांची भूमिका उमेदवाराचे भवितव्य विजयात किंवा पराजयात बदलण्याचे सामर्थ्य असणारी आहे. सन २०१४ मध्ये धनंजय महाडिक यांना खासदार करण्यात महिलांचा मोठा वाटा होता या अनुभवानंतर यंदाच्या निवडणुकीतही त्यांनी निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच महिला मतदारांना प्राधान्य दिले आहे. दुसरीकडे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्याही कार्यकर्त्यांकडून महिलांमध्ये जोमाने प्रचार सुरू आहे.
बदल होतोय...
लोकसंख्येच्या ५० टक्के वाटा असलेल्या महिला कुटुंबातले पुरुष सांगतील त्या उमेदवाराच्या चिन्हापुढे बोट लावून यायच्या. आता मात्र त्यांच्यात सारासार विचार करून मतदान करण्याचे व जागरूकतेचे प्रमाण वाढले आहे. प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलता हा स्थायीभाव असल्याने महिलांनी एकदा ठरविले की त्या निर्णयापासून ढळत नाहीत. त्यामुळे त्यांची मने जिंकली की यशाचा मार्ग सुकर होतो. दुसरीकडे ग्रामीण भागात विशेषत: अशिक्षित किंवा वाड्या-वस्त्यावरील महिलांचे मत मात्र अजूनही पुरुषांच्याच हाती असल्याचे वास्तव असले तरी बदल होतोय हे नक्की.