सहकाराचा 'गड' ढासळतोय
By admin | Published: October 27, 2014 12:18 AM2014-10-27T00:18:00+5:302014-10-27T00:26:20+5:30
संचालकांचा कारभार चव्हाट्यावर : भुदरगड तालुक्यातील ३४ सहकारी संस्था अवसायानात
शिवाजी सावंत-गारगोटी -सहकार पंढरी अशी बिरूदावली मिरवणाऱ्या भुदरगड तालुक्यातील तब्बल ३४ सहकारी संस्था अवसायानात निघत असल्याने संस्थांमधील संचालक मंडळांचा गैरकारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
१९६० पासून सहकाराची मुहूर्तमेढ या तालुक्यात रोवली गेली. सेवा संस्था, पतसंस्था, ग्राहकसंस्था, पाणीपुरवठा संस्था, पाणी वापर संस्था, खरेदी-विक्री संघ अशा विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्था उदयास आल्या. त्यात पतसंस्था गल्लीबोळात झाल्या.
राजकीय पुढाऱ्यांनी राजकारणात बस्तान बसविण्यासाठी सहकारी संस्था काढण्याचा धडाका लावला. त्यात राष्ट्रीयीकृत बॅँका शेतकऱ्यांना पतपुरवठा करताना अनेक जाचक अटी लावत होत्या. त्यावेळी गावातील पुढारी आपल्या पतसंस्थेतील रक्कम कर्ज म्हणून देत असे. कोणत्याही जाचक अटीविना विनासायास कर्ज मिळत असल्याने शेतकऱ्यालाही बरे वाटू लागले. लग्न समारंभ, घर बांधणी, आजारपण यात हक्काचा आधार म्हणजे पतसंस्था वाटू लागल्या. पतसंस्थेला पूरक अशा दूध संस्था उभारल्या गेल्या. याचा फायदा अल्पशिक्षित व सुशिक्षित बेकारांना झाला. घरची शेती, जनावरे सांभाळून नोकरी करता येऊ लागल्याने तेही सुखावले; पण राजकारण भक्कम करण्याच्या नादात ऐपतीपेक्षा व स्थावर किमतीपेक्षा जादा कर्जे दिली गेली आणि येथूनच या सहकार पंढरी असणाऱ्या या तालुक्याला केवळ संचालकांच्या मनमानी कारभारामुळे हाहाकार पंढरी करून सोडले.
सहकारात निरपेक्ष भावनेचा अभाव झाला आणि स्वाहाकार शिरला की सहकार मोडीत निघते हे सबळ उदाहरणाने भुदरगडातील संस्थांनी दाखविले आहे. तालुक्यातील तीन ग्राहक संस्था, १७ पाणीपुरवठा संस्था, १३ खरेदी-विक्री संघ, एक पतसंस्था अशा ३४ सहकारी संस्था अवसायानात निघत आहेत. या संस्थांच्या संस्थाचालकांनी ‘अ’ फाईल, मूळ कागदपत्रे, ९७ वी घटनादुरुस्ती, वार्षिक माहिती, निवडणूक माहिती यांसारखी कागदपत्रे वेळच्या वेळी सहायक निबंधक यांच्याकडे सादर केली नाहीत. याबाबत निबंधकांनी वेळोवेळी आदेश काढून देखील या संस्थांच्या संचालकांनी कोणताही पाठपुरावा न केल्याने या संस्था कायमच्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अवसायानात निघालेल्या संस्था
शाहू-पिंपळगाव, शिवशंभो (वाघापूर) या दोन्ही ग्राहक संस्था, भाग्योदय वाघापूर, विठ्ठल कोनवळे, भुजाईदेवी टिक्केवाडी, शिवतेज नितवडे, काळम्मादेवी मिणचे खुर्द, डोंगराई गिरगाव, रामलिंग पाण्याचा हुडा, ब्रह्मचैतन्य मडिलगे खुर्द, बलभीम तिरवडे, जीवनधारा पायर्डे, मंडलेश्वर मडिलगे बुद्रुक या अकरा पाणी वापर संस्था. जयभवानी मिरची पाटगाव, सुवर्णादेवी घोरपडे आईल मिल वाघापूर, सुवर्णादेवी घोरपडे मिरची उत्पादक संस्था वाघापूर, यमाई फळफळावळ कोनवडे, पावडाई भात मोरेवाडी, नृसिंह तेल बिया मोरेवाडी, गणपतराव शिंदे वेसर्डे, ज्योतिर्लिंग शेतीमाल गारगोटी, गजानन फळफळावळ नाधवडे, पार्वती नाना पाटील भात पंडीवरे, मराठी मिरची व तेल बिया गारगोटी, साई समर्थ भात व मक्का कूर, जोतिर्लिंग फळेभाजी पुष्पनगर, इंदिरा भात-सोयाबीन पुष्पनगर हे सर्व खरेदी-विक्री व प्रक्रिया संघ, तर सर्वनागरी सहकारी पतसंस्था करंबळी ही एकमेव पतसंस्था.