गडहिंग्लज पालिकेतील राजकीय समीकरण बदलणार..! : भाजपविरोधात जनता दल, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 11:22 PM2019-12-05T23:22:50+5:302019-12-05T23:24:20+5:30
गडहिंग्लज कारखान्याप्रमाणेच पालिकेच्या राजकारणात आमदार मुश्रीफ हे शिंदेंसोबतच राहण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी काळात पालिकेतही नवे समीकरण पाहायला मिळेल.
राम मगदूम।
गडहिंग्लज : राज्यातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज नगरपालिकेतील राजकीय समीकरणदेखील बदलण्याची शक्यता आहे. वाढीव हद्दीतील निवडणुकीत भाजपविरोधात सत्ताधारी जनता दल आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला पालिकेच्या सत्तेपासून दूर व्हावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नोव्हेंबर २०१६ मध्ये पालिकेच्या निवडणुकीत तत्कालीन सत्ताधारी जनता दलाच्या विरोधात राष्ट्रवादी आणि भाजप-शिवसेना युती असा तिरंगी सामना झाला. त्यावेळी जनता दलाला नगराध्यक्षपदासह ११, राष्ट्रवादीला ४, भाजपला २ व सेनेला १ जागा मिळाली होती; परंतु निवडणुकीनंतर भाजप-सेनेने जनता दलाबरोबर युती केली.
केंद्र व राज्यातील सत्ताधारी पक्ष म्हणून जनता दलाने भाजप-सेनेला पालिकेत सोबत घेतले. महिला व बालकल्याण समितीचे सभापतिपद देऊन त्यांना सत्तेत सामावून घेतले; परंतु तीन वर्षांत नियमित निधी वगळता शासनाकडून शहरातील विकासकामांसाठी रुपयाचादेखील निधी मिळाला नाही. म्हणूनच, आता राष्ट्रवादीला सोबत घेतले जाण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना पाठिंबा देऊन ‘गडहिंग्लज’मधून मताधिक्य दिले. त्यामुळे गडहिंग्लज कारखान्याप्रमाणेच पालिकेच्या राजकारणात आमदार मुश्रीफ हे शिंदेंसोबतच राहण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी काळात पालिकेतही नवे समीकरण पाहायला मिळेल.
‘जद’ला काय फायदा ?
आमदार मुश्रीफ हे राज्यातील वजनदार नेते असल्याने नजीकच्या काळात त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या सहकार्याने शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून भरीव निधी मिळविण्यासाठी जनता दलाला आता राष्ट्रवादीला सोबत घ्यावे लागणार आहे.
‘शिंदें’चे विधान सूचक
गडहिंग्लजच्या हद्दवाढीला आपल्यामुळेच मंजुरी मिळाल्याने वाढीव दोन्ही जागांवर आपलाच अधिकार असल्याचा दावा भाजपने केल्यामुळेच भाजप नगरसेवकांनी आघाडीसोबत राहावे, अन्यथा खुशाल बाहेर पडावे, असे सूचक विधान शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले आहे. यातूनच पालिकेतील समीकरण बदलण्याचे संकेत मिळाले.
राष्ट्रवादीला काय फायदा?
सत्ताधारी जनता दलासोबत जाऊन एखाद्या समितीचे सभापतिपद मिळवून पालिकेच्या सत्तेत जाण्याची संधी राष्ट्रवादीला आली आहे.