‘गडहिंग्लज पॅटर्न’ राज्यभर पोहोचेल
By admin | Published: June 19, 2015 11:32 PM2015-06-19T23:32:22+5:302015-06-20T00:34:28+5:30
विलास पाटील : कन्नड भाषिक विद्यार्थ्यांच्या समस्येबाबत संयुक्त बैठक
गडहिंग्लज : कानडी मातृभाषिक विद्यार्थ्यांच्या मराठी भाषा समृद्धीचा गडहिंग्लज तालुक्याचा विशेष उपक्रम यशस्वीरीत्या राबवूया. राज्यभर हा उपक्रम गडहिंग्लज पॅटर्न म्हणून राबविला जाईल, असा विश्वास ‘डाएट’चे प्राचार्य विलास पाटील यांनी व्यक्त केला.गडहिंग्लज पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे कानडी मातृभाषिक विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत आयोजित संयुक्त बैठकीत ते अध्यक्षपदावरून बोलत होते. गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांसह आजी-माजी शिक्षकांनी अनुभव कथनाबरोबरच उपाययोजनाही सुचविल्या.
प्रा. डॉ. रमेश व्हसकोटी म्हणाले, मातृभाषेशिवाय अन्य भाषा शिकण्याची प्रक्रिया नैसर्गिक व सोपीच हवी. उच्चार व पाठांतराबरोबरच मराठी बोलण्याचा सराव करून घ्यायला हवा.
ज्येष्ठ शिक्षक एकसंबे गुरुजी म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत.
माजी केंद्रप्रमुख आर. बी. पाटील म्हणाले, संवादात्मक व कृतीयुक्त अध्यापनाचा वापर करावा. परिसर भेटीतून मुलांना बोलते करावे. शिक्षकांनी आव्हान स्वीकारून काम केल्यास निश्चित यश मिळेल.
राजेंद्र चौगुले म्हणाले, मुलांच्या भाषेत बोलल्यास त्यांच्या भावना समजतील. मनातील भीती दूर केल्यास त्यांना अध्ययानाची गोडी लागून उपस्थितीही वाढेल.
सुमन जाधव म्हणाल्या, भाषिक अडचणीबाबत अंगणवाडी शिक्षिका व सेविकांचीही कार्यशाळा घ्यावी.
पं. स. सदस्य अॅड. हेमंत कोलेकर म्हणाले, अध्यापनाच्यावेळी कन्नड-मराठी शब्दकोष वापरावा.
पं. स.चे सदस्य बाळेश नाईक म्हणाले, भाषिक समस्येवर उपाय शोधण्याचा उपक्रम स्तुत्य आहे.
उपसभापती तानाजी कांबळे म्हणाले, सीमाभागातील मूलभूत समस्येवर उपाय शोधण्याच्या उपक्रमास सर्व प्रकारचे सहकार्य राहील. विस्तार अधिकारी रमेश कोरवी, जोतीबा पाटील, शशिकला पाटील, चंद्रकांत मुन्नोळी यांनीही मनोगत व्यक्त केले. बैठकीस आजी-माजी शिक्षक उपस्थित होते. विस्तार अधिकारी बसवराज गुरव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)