‘गडहिंग्लज’मध्ये नदीकाठच्या गावांतही टंचाई!
By admin | Published: February 11, 2016 09:26 PM2016-02-11T21:26:18+5:302016-02-11T23:41:33+5:30
यावर्षी जानेवारीपासूनच खणदाळपासून नांगनूर बंधाऱ्यापर्यंत ‘हिरण्यकेशी’चे पात्र कोरडे पडले आहे.
‘हिरण्यकेशी’ कोरडी ठणठणीत : दहा वर्षांतील पहिलीच वेळ; पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची दाहिदिशा भटकंती
राम मगदूम --- गडहिंग्लज -‘चित्री’ प्रकल्पामुळे गडहिंग्लज तालुक्यातील हिरण्यकेशी नदीकाठच्या गावांच्या शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. मात्र, यावर्षी जानेवारीपासूनच खणदाळपासून नांगनूर बंधाऱ्यापर्यंत ‘हिरण्यकेशी’चे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांसह सीमाभागातील खेड्यांनाही पाणीटंचाईची झळ बसत आहे. गेल्या दहा वर्षांतील ही अशी पहिलीच वेळ आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना दाहिदिशा भटकंती करावी लागत आहे.
२००३ मध्ये चित्री धरण प्रकल्प पूर्ण झाला. त्यामुळे हिरण्यकेशी नदीकाठच्या खेड्यांच्या शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला. तथापि, निलजी बंधाऱ्यापलीकडे ‘चित्री’चे लाभक्षेत्र नसल्यामुळे नांगनूरपर्यंतच्या लोकांना ‘सरकार’च्या मेहरबानीवरच अवलंबून राहावे लागते. केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातूनच टंचाईच्या काळात ‘चित्री’चे पाणी नांगनूरपर्यंत सोडले जाते. याचा फायदा सीमाभाग, तसेच कर्नाटकातील गावांनाही होतो.
यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्यामुळे चित्री धरणात केवळ ५० टक्के पाणी शिल्लक आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील उभी पिके वाचविण्यासाठी पाटबंधारे खात्याने डिसेंबरपासूनच हिरण्यकेशी नदीवर उपसाबंदी कार्यक्रम राबवायला सुरुवात केली आहे. मात्र, खणदाळ बंधाऱ्याच्या पुढे ‘हिरण्यकेशी’च्या उत्तरेला कर्नाटक आणि दक्षिणेला महाराष्ट्राची हद्द आहे. उपसाबंदी काळात महाराष्ट्रातील कृषिपंप बंद राहतात; परंतु कर्नाटकातील कृषिपंपांवर कोणतेही निर्बंध नसल्यामुळेच खणदाळपासून नांगनूरपर्यंतचे नदीपात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे.
‘हिरण्यकेशी’ कोरडी पडल्यामुळे खणदाळ, नांगनूर, अरळगुंडी, इदरगुच्ची व चंदनकूड या गावांत सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील लोकांना गावातील एखाद्या कूपनलिकेचा आणि शेतवाडीतील विहिरींचा आधार
घ्यावा लागत आहे. अधिक
वापर असणाऱ्या काही मंडळींवर
पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा या परिसरातील शेतकऱ्यांनी उसाची नवीन लावण केलेली नसून, काही शेतकऱ्यांनी पाण्याअभावी खोडवे-निडवेही काढले आहेत. पाण्याअभावी उसासह अन्य पिके वाळू लागली आहेत. नदीवर अवंलबून असणाऱ्या या सर्व गावांतील नळ योजना पाण्याअभावी कुचकामी ठरल्या आहेत. त्यामुळेच चित्री प्रकल्पाची उंची वाढविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कर्नाटकातील गावांनाही झळ
1४० हजार लोकसंख्येच्या संकेश्वरची नळ योजनादेखील पूर्वी ‘हिरण्यकेशी’च्या पाण्यावरच अवलंबून होती. अलीकडे हिडकल जलाशयावरून पाणी आणल्यामुळे संकेश्वरकरांची तृष्णा शांत झाली आहे. मात्र, संकेश्वरमध्येदेखील सध्या आठवड्यातून एकदाच पाणी सोडले जात आहे. त्यामुळे त्यांनाही ‘चित्री’च्या पाण्याची प्रतीक्षा लागली आहे.
2 कणगल्यासह नऊ गावांसाठी राबविण्यात आलेल्या ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनेचे जॅकवेलदेखील संकेश्वरच्या जॅकवेलनजीकच आहे. याठिकाणीही नदीत पाणी नसल्यामुळे कणगला, बाड, बाडवाडी, करजगा, कोणकेरी, व्हन्नीहळ्ळी, हरगापूरगड, हरगापूर, आलूर (केएम), अकिवाट, केस्ती व सोलापूर या गावांचा नळ पाणीपुरवठाही बंद झाला आहे. तद्वतच, गोटूर, चिकालगूढ, हेब्बाळ व कोचरी या गावांतील पाणी प्रश्नही गंभीर बनला आहे.
या खेड्यांना भेडसावतेय टंचाई
महाराष्ट्रातील खणदाळ, नांगनूर, कडलगे, अरळगुंडी, इदरगुच्ची व चंदनकूड या नदीकाठच्या आणि लगतच्या गावांतही जानेवारीपासून पाणीटंचाई भेडसावत आहे. तेरणी तलावात एक थेंबसुद्धा पाणी नाही. नरेवाडी व येणेचवंडी या तलावातील पाण्यानेही तळ गाठल्यामुळे हलकर्णी परिसरातील बहुतांश सर्वच खेडी दुष्काळाच्या छायेत आहेत.