गडहिंग्लज बंदला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:27 AM2021-02-16T04:27:13+5:302021-02-16T04:27:13+5:30
गडहिंग्लज : अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांनी पुकारलेल्या गडहिंग्लज बंदला आज, सोमवारी (१५) संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान, ...
गडहिंग्लज : अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांनी पुकारलेल्या गडहिंग्लज बंदला आज, सोमवारी (१५) संमिश्र प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याची सक्ती आणि किराणा भुसार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेश बोरगावे यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका केल्याबद्दल आंदोलनाचे प्रमुख शिवाजी खोत यांचा शहरातील विविध व्यापारी संघटनांतर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे निषेध करण्यात आला आहे.
थकीत फायनल पेमेंट, ग्रॅच्युइटी व वेतन फरकाची रक्कम मिळावी या मागणीसाठी २८ दिवसांच्या धरणे आंदोलनानंतर आमरण उपोषण करणाऱ्या ४ कामगारांना रविवारी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, आज ‘गडहिंग्लज शहर बंद’ची हाक कामगारांनी दिली होती.
सोमवारी (१५) दुपारी कामगारांनी जोरदार घोषणाबाजीत शहरातील अहिल्याबाई होळकर चौक, लक्ष्मी मंदिर, नेहरू चौक, बाजारपेठ, बसवेश्वर पुतळा ते प्रांतकचेरी अशी फेरी काढली.
फेरीत सेवानिवृत्त कामगार संघटनेचे प्रमुख चंद्रकांत बंदी, विठ्ठल भमानगोळ, सुभाष पाटील, लक्ष्मण देवार्डे, महादेव मांगले आदींसह कामगार सहभागी झाले होते.
------
व्यापाऱ्यांचा इशारा
कोणतीही पूर्वसूचना न देता बंद पुकारून व्यापाऱ्यांना दुकान बंद करण्याची सक्ती आणि गडहिंग्लज चेंबर ऑफ कॉमर्सचे कार्याध्यक्ष राजेश बोरगावे यांच्यावरील वैयक्तिक पातळीवरील टीकेचा निषेध नोंदवून यापुढे असे प्रकार घडल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी पत्रकातून दिला आहे.
------
फोटो ओळी-
गडहिंग्लज साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शहरातील प्रमुख मार्गांवरून सोमवारी दुपारी फेरी काढली.