गडहिंग्लज परिसर बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:24 AM2021-03-23T04:24:14+5:302021-03-23T04:24:14+5:30
गडहिंग्लज : इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करावी, अन्यथा त्यासाठी आंदोलन ...
गडहिंग्लज : इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करावी, अन्यथा त्यासाठी आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा ज्येष्ठ ग्रामस्थ अमृत शिंत्रे यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेनातून दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे, २९ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत महालक्ष्मी यात्रा करण्याचे नियोजन सुरू आहे. परंतु, गेल्या दोन वर्षांत अतिवृष्टीमुळे ऊस, भात व सोयाबीनचे मोठे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक अडचणीत आहे.
कोरोनामुळे अनेक गावांतील यात्रा रद्द झाल्या असतानाही इंचनाळमध्ये यात्रेची तयारी सुरू आहे. शासनाकडून परवानगी नसतानादेखील लोकांना कोरोना आणि कर्जाच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे यात्रा रद्द करावी, अशी मागणी शिंत्रे यांनी केली आहे.
----------------------------------------
२) गडहिंग्लज कारखान्याची मंगळवारी वार्षिक सभा
गडहिंग्लज : हरळी (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (३०) दुपारी १ वाजता होणार आहे, अशी माहिती प्रभारी कार्यकारी संचालक तथा सचिव मनोहर मगदूम यांनी दिली.
कारखान्याचे अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही सभा येथील स्वयंवर सांस्कृतिक भवनात (मंत्री हॉल) ऑनलाइन पद्धतीने होईल.
----------------------------------------
३) संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार
गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना व ब्रिस्क फॅसिलिटीज कंपनीकडून थकित संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार सेवानिवृत्त कामगारांनी बैठकीत केला. येथील महादेव मंदिरात ही बैठक झाली. १४ जानेवारीपासून येथील प्रांतकार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे. फायनल पेमेंट, ग्रॅच्युईटी व वेतनवाढ फरकासह थकित संपूर्ण रक्कम मिळावी, अशी कामगारांची मागणी आहे.
ब्रिस्क कंपनी आणि कारखान्यानेही आपापल्या कालावधीतील थकित रक्कम द्यायला सुरूवात केली आहे. परंतु, संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवावे, असा निर्णय बैठकीत झाला.
दरम्यान, ब्रिस्क कंपनीने कारखाना सोडणार असल्याचे पत्र शासनाला दिले आहे. त्यावर ३१ मार्चला सुनावणी आहे. परंतु, ब्रिस्क अथवा अन्य कोणीही कारखाना चालवायला देताना सेवानिवृत्त कामगारांच्या थकित देणीचा मुद्दा करारात समाविष्ट करणे आवश्यक आहे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी सेवानिवृत्त कामगार संघटनेचे प्रमुख चंद्रकांत बंदी, सुभाष पाटील, रणजित देसाई, बबन पाटील, महादेव मांगले, रामाप्पा करिगार, सुरेश पाटील आदींसह कामगार उपस्थित होते.