गडहिंग्लज परिसर सिंगल बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:17 AM2021-07-02T04:17:07+5:302021-07-02T04:17:07+5:30
गडहिंग्लज : इंचनाळ येथील आजी-माजी मुंबईकर मंडळींनी उंबरदेव मंदिराशेजारी हॉल बांधण्यात यावे, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे ...
गडहिंग्लज : इंचनाळ येथील आजी-माजी मुंबईकर मंडळींनी उंबरदेव मंदिराशेजारी हॉल बांधण्यात यावे, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनातून केली आहे. याबाबतचे निवेदन जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी स्वीकारले. यावेळी शिवाजी राणे, मोहन पोवार, जनार्दन पाटील, जालंदर पाटील, ईश्वर निकम, सुरेश चौगुले आदी उपस्थित होते.
२) उत्तूरमध्ये आजपासून कार्यशाळा
गडहिंग्लज : उत्तूर (ता. आजरा) येथील कॉज टू कनेक्ट फाउंडेशन संचलित हुन्नर गुरूकुलमध्ये विद्यार्थ्यांना पायाभूत इलेक्ट्रिकलचे प्रशिक्षण २ व ३ जुलै सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत देण्यात येणार आहे. प्रशिक्षण काळात विद्युत ऊर्जेविषयी माहिती, संकल्पना, सुरक्षितेचे नियम, अपघात व प्रथमोपचार, उपकरणे व साधने ओळख, वायरिंगचे प्रकार याविषयी अतुल कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत.
--
३) 'संत गजानन'मध्ये कार्यशाळा
गडहिंग्लज : चिंचेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन फार्मसी महाविद्यालयात 'इमर्जिंग ट्रेण्डस् आॅफ क्लिनिक रिसर्च' व 'फार्माकोव्हजिलन्स इन इंडिया' व 'करिअर चॉईस फॉर लाईफ सायन्स ग्रॅज्युएट्स' या विषयावर आॅनलाईन राष्ट्रीय कार्यशाळा पार पडली. अर्चना मगदूम यांनी स्वागत केले. एस. जी. किल्लेदार प्रास्ताविक केले. यावेळी अॅड. अण्णासाहेब चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, प्रा. स्वप्निल हराळे आदी उपस्थित होते.
-
४) 'संत गजानन'मध्ये शनिवारी कार्यशाळा
गडहिंग्लज : चिंचेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज इंजिनिअरिंग महाविद्यालयात शनिवार (३) सकाळी ११ वाजता बारावी विज्ञान शाखेमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम, त्यातील बदल तसेच आॅनलाईन अर्ज कसा करावा, या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. इच्छूक विद्यार्थ्यांनी नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत यांनी केले आहे.
-
-- ५) करंबळी येथे औषधे भेट
गडहिंग्लज : करंबळी येथील आजी-माजी सैनिक संघटनेकडून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला औषधे भेट देण्यात आली. कोरोना काळात उपकेंद्राला औषधांची कमतरता भासत आहे.
औषधांसाठी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत आजी-माजी सैनिकांनी १६५०० रुपयांची औषधे दिली. अंगणवाडी उपकेंद्रास दोन सीलिंग फॅन, अंगणवाडी कर्मचारी व आशा स्वयंसेविकांना गरम पाण्यासाठी थर्मास असे एकूण ३० हजारांची मदत देण्यात आली.
यावेळी सरपंच प्रवीण माळी, सुभाष इंगळे, प्रशांत खराडे, हरिबा जाधव, रामगोंडा पाटील, निकिता मोहळे, रंगराव भोईटे, संभाजी जाधव, बाळगोंडा पाटील आदी उपस्थित होते.