गडहिंग्लज विभाग सिंगल बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:52 AM2020-12-11T04:52:50+5:302020-12-11T04:52:50+5:30

गडहिंग्लज : मासेवाडी (ता. गडहिंग्लज) येथे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या ६० हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकी बांधकामाचा ...

Gadhinglaj Division Single News | गडहिंग्लज विभाग सिंगल बातम्या

गडहिंग्लज विभाग सिंगल बातम्या

Next

गडहिंग्लज : मासेवाडी (ता. गडहिंग्लज) येथे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या ६० हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकी बांधकामाचा प्रारंभ लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता मयेंक कुरुंदवाडकर यांच्या हस्ते झाला. यावेळी अशोक टक्केकर, दिनकर निकम, गुंडू कापसे, शिवराम कापसे, सचिन पाटील, आदी उपस्थित होते.

----------------------

तुडियेतील विद्युत ट्रान्सफाॅर्मर धोकादायक

चंदगड : तुडिये गावाला वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिन्यांसाठी १९७२ मध्ये उभारण्यात आलेल ट्रान्सफाॅर्मर सध्या कोसळण्याच्या स्थितीत आहे. ट्रान्सफाॅर्मरचे दोन्ही बाजूंचे खांब व वीजवाहिन्यांचे अँगलही गजले आहेत. तसेच ट्रान्सफाॅर्मरला झुडपांचा विळखा पडला आहे. महावितरणने याकडे लक्ष देवून त्वरित येथे दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

-----------------------

‘जडेयसिद्धेश्वर’मधील कार्यक्रम रद्द

गडहिंग्लज : कोरोनामुळे शहरातील बेलबागेत जडेयसिद्धेश्वर आश्रमात होणारा जडेयसिद्धेश्वर महाशिवयोगींचा ७४ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

-----------------------

तळगुळी-दिंडलकोप रस्त्याची चाळण

चंदगड : तळगुळी ते दिंडलकोप रस्त्याची अक्षरक्ष: चाळण झाली आहे. ११ वर्षांपूर्वी डांबरीकरण झालेल्या या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने चार वर्षांपूर्वी दुरुस्ती केली होती. मात्र, तालुक्यात होणारा जोरदार पाऊस व रस्त्याकडेच्या गटारीही बुजल्याने पावसामुळे तळगुळी-दिंडलकोप-कुरीहाळ या ६ किलोमीटर हद्दीपर्यंत रस्त्यावरील संपूर्ण खडी उखडून जाऊन रस्त्याची दुर्दशा झाली आहे.

-----------------------

कोवाडे-दाभेवाडी रस्ताकामास प्रारंभ

पेरणोली : कोवाड ते दाभेवाडी (ता. आजरा) पर्यंतच्या रस्ता डांबरीकरणाचा प्रारंभ माजी सरपंच विजया भदरगे यांच्या हस्ते झाला. आमदार राजेश पाटील यांच्या फंडातून या कामासाठी नऊ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यावेळी मुकूंदराव देसाई, जिल्हा परिषदेचे सदस्य जयवंत शिंपी, मनोहर जगदाळे, अजित हरेर, दशरथ हुंदळेकर, ग्रामसेवक अंकुश पाटील, सागर घोडके, आदी उपस्थित होते.

-----------------------

आजरा हायस्कूलचे यश

आजरा : जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे घेण्यात आलेल्या नाट्यछटा स्पर्धेत आजरा हायस्कूलने यश मिळविले. मुले लहान गटात- प्रथमेश सामंत (प्रथम), आर्यन कांबळे (उत्तेजनार्थ) मुलींमध्ये - गतिमा अडकूरकर (प्रथम), मनाली पाटील (द्वितीय) क्रमांक मिळविला. नाट्यछटांचे दिग्दर्शन मनीषा येसणे, एम. एस. कांबळे यांनी केले. त्यांना मुख्याध्यापक शिवाजी येसणे व शिक्षकांचे प्रोत्साहन मिळाले.

-----------------------

रस्ता डांबरीकरणाची मागणी

चंदगड : येथील चाळोबा मंदिर ते रवळनाथ मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी भाजप नगरसेवकांनी नगरपंचायतीकडे निवेदनातून केली आहे. रवळनाथ मंदिर हे ८४ खेड्यांचे श्रद्धास्थान आहे.

चंदगड, गडहिंग्लज, आजरा, कोकण व कर्नाटकनातील लाखो भाविकांची या रस्त्यावरून वर्दळ असते. सध्या रवळनाथ देवाचा उत्सव जवळ आला असून उत्सवापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे.

शिष्टमंडळात, सचिन नेसरीकर, दिलीप चंदगडकर, संजना कोकरे, नूरजहाँ नाईकवाडे, प्रमिला गावडे, विजय कडूकर, आदींचा समावेश होता.

-----------------------

माडखोलकर महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणाची सोय

चंदगड : येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण केंद्रांतर्गत एम. ए. व एम. कॉम. या वर्गांच्या पदव्युत्तर शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. पात्रताधारक विद्यार्थ्यांनी ३१ डिसेंबरपूर्वी प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. आर. पी. पाटील यांनी केले आहे.

-----------------------

मोनिका डांटस यांना पुरस्कार

चंदगड : किणी येथील मोनिका डांटस (सध्या रा. कळंबोली, मुंबई) यांना हुपरीच्या लोकसेवा महासंघातर्फे देण्यात येणाऱ्या ‘आदर्श समाजसेविका’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी ज्योतिषविशारद मानसी पंडित, पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाठ, इचलकरंजीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाबूराव महामुनी उपस्थित होते.

-----------------------

चाळोबाची महापूजा उत्साहात

पेरणोली : आजरेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या हाळोली (ता. आजरा) येथील चाळोबा देवाची महापूजा चाळोबा डोंगरावर भक्तिमय वातावरणात पार पडली. काेरोनाबाबत योग्य ती खबरदारी घेऊन गावकऱ्यांसह आजूबाजूच्या भाविकांनी धार्मिक कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.

Web Title: Gadhinglaj Division Single News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.