गडहिंग्लज कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:24 AM2021-04-10T04:24:58+5:302021-04-10T04:24:58+5:30
गडहिंग्लज : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचा ताबा अखेर संचालक मंडळाकडे आला. ब्रिस्क कंपनी व संचालकांच्या संयुक्त ...
गडहिंग्लज :
अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचा ताबा अखेर संचालक मंडळाकडे आला. ब्रिस्क कंपनी व संचालकांच्या संयुक्त बैठकीतील चर्चेअंती साखर संचालक तथा कारखाना हस्तांतरण समिती प्रमुख डॉ. संजयकुमार भोसले यांनी कारखान्याचा ताबा आज, शुक्रवारी सायंकाळी संचालक मंडळाकडे सुपुर्द केला. १० वर्षांचा करार संपायला अजून २ वर्षे शिल्लक असतानाच कंपनीने ठरल्याप्रमाणे कारखान्याला अखेर रामराम ठोकला.
हरळी (ता. गडहिंग्लज) येथे कारखान्याच्या कार्यस्थळावर ही बैठक झाली. यावेळी डॉ. भोसले, प्रादेशिक साखर सहसंचालक डॉ. एस. एन. जाधव, लेखापरीक्षक पी. ए. मोहळकर व शीतल चोथे, ‘ब्रिस्क’चे जनरल मॅनेजर वसंत गुजर, फायनान्स मॅनेजर आनंदा लोहार, कारखान्याचे अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे, उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे, माजी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी चर्चेत भाग घेतला.
भोसले म्हणाले, ब्रिस्क व कारखाना यांच्यातील येणी-देणीसंदर्भात प्रादेशिक साखर सहसंचालक व लेखापरीक्षक येत्या आठवडाभरात दोन्ही घटकांशी समोरासमोर चर्चा करून त्याचा अहवाल साखर आयुक्तांना देतील. त्यानंतरच सहकार सचिव येणी-देणीबाबत अंतिम आदेश देतील.
शिंदे म्हणाले, ऊस बिले, कामगारांची थकीत व अन्य देणी कंपनीने महिन्याच्या आत द्यावीत.
चव्हाण म्हणाले, थकीत देणीबाबत कंपनीकडून लेखी हमी घ्यावी.
नलवडे म्हणाले, घाईगडबडीने कारखान्याचा ताबा देण्यात दडपशाहीचा वास येतो. आवश्यकता भासल्यास कंपनीकडून पेनल्टी वसूल करावी.
यावेळी संचालक बाळासाहेब मोरे, संभाजी नाईक, दीपक जाधव, सतीश पाटील, अमर चव्हाण, प्रकाश पताडे, विद्याधर गुरबे, बाळकृष्ण परीट, अनंत कुलकर्णी, सुभाष शिंदे, सदानंद हत्तरकी, क्रांतीदेवी कुराडे व जयश्री पाटील, साखर कामगार संघाचे जनरल सेक्रेटरी शशीकांत चोथे उपस्थित होते.
--------------------------------------
*
पंचनामा व ऑडिटची मागणी ‘ब्रिस्क’च्या कार्यकाळातील कारखान्याचे नुकसान स्पष्ट होण्यासाठी कारखाना आवारातील भौतिक स्थितीचा पंचनामा व मशिनरीच्या टेक्निकल ऑडिटसाठी तातडीने आदेश द्यावेत, असे पत्र कारखान्यातर्फे साखर आयुक्तांना देण्यात आले.
--------------------------------------
*
ठळक नोंदी
* २०१३-२०१४ मध्ये तत्कालीन उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण व त्यांच्या १५ सहकारी संचालकांनी कारखाना ‘ब्रिस्क’ला सहयोग तत्त्वावर चालवायला दिला होता; परंतु आज विरोधी बाकावर असतानाही ते कारखाना पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शिंदे-नलवडे यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले.
* माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.
--------------------------------------
*
फोटो ओळी : हरळी (ता. गडहिंग्लज) येथे साखर संचालक डॉ. संजयकुमार भोसले यांनी ‘ब्रिस्क कंपनी’कडून गडहिंग्लज कारखान्याचा ताबा अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे, उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी संचालक व अधिकारी उपस्थित होते.
क्रमांक : ०९०४२०२१-गड-१३