गडहिंग्लज कारखाना चालवून दाखवावा, श्रीपतराव शिंदेंचे प्रशासकांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 11:47 AM2022-02-25T11:47:19+5:302022-02-25T11:56:21+5:30
उच्च न्यायालयाने स्थगिती मागे घेतल्याने कारखान्यावर प्रशासक मंडळाची नियुक्ती कायम झाली
गडहिंग्लज : आम्ही आजअखेर कारखाना चालविला, अजूनही कार्यक्षेत्रात ऊस शिल्लक आहे. प्रशासकांचे आम्ही स्वागत करतो. प्रशासकांनी आणि त्यांना आणण्यासाठी प्रयत्न केलेल्यांनी कारखाना चालवून दाखवावा. ऊसाची आणि तोडणी-वाहतुकीची बिले न दिल्यास प्रशासकांना कारभार करणे कठीण जाईल, असा इशारा आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
बुधवारी (२३) उच्च न्यायालयाने स्थगिती मागे घेतल्याने प्रशासक मंडळाची नियुक्ती कायम झाली. या पार्श्वभूमीवर त्यांनी चालू हंगामातील गळीताचा लेखाजोखा मांडण्याबरोबरच विरोधकांवर जोरदार हल्लाबोलही केला. त्या १२ संचालकांनी शेतकऱ्याचा घात केला आहे त्यांच्यापासून सभासदांनी सावध रहावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी संचालक अमर चव्हाण, संभाजी नाईक व बाळकृष्ण परीट यांची उपस्थिती होती.
शिंदे म्हणाले, कारखाना बंद पाडण्याचे षड्:यंत्र होते. त्यासाठीच कर्जपुरवठ्यात अडथळे आणण्यात आले. त्यामुळे ठेवी गोळा करून कारखाना सुरू केला. त्यानंतर ऊसाची बिले देण्यासाठी राज्य बँकेसह केडीसीकडे साखर तारण कर्ज मागितले, तेदेखील मिळाले नाही.
अमर चव्हाण म्हणाले, कारखान्याच्या कर्जाचा बोजा आपल्या सात-बाºयावर नको म्हणणाºयांनीच प्रशासक आणला. बॉयलरमध्ये घातपात घडवून कारखाना बंद पाडला, वजनकाट्याबद्दल अपप्रचार करून कारखान्याची बदनामी केली. त्यामुळे गाळप कमी झाले. त्यामुळे योग्यवेळी शेतकरीच त्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करतील. बदनामी थांबवली नाही तर ‘जशास तसे’ उत्तर देवू.
त्यांनी ‘लोकशाही’वर बोलू नये !
साखर विक्री समितीच्या सभेत संस्थापक नलवडे यांच्या सह्यांचे अधिकार काढून घेतलेल्या आणि घड्याळाचे काटे फिरवून संचालक मंडळाची ‘मिटींग इज ओव्हर’ असे सांगणाऱ्या शहापूरकरांनी लोकशाहीवर बोलू नये, असा टोला शिंदेंनी लगावला.
गळीत व उत्पन्नाचा लेखा-जोखा (२८ डिसेंबर ते २३ फेब्रुवारी २०२२)
ऊस गाळप - ६९२३७ मे. टन
साखर उत्पादन - ७६,८०० क्विंटल
स्पिरीट उत्पादन - ३,४६,७५१ लिटर
जमा (लाखात)
साखर विक्रीतून - १०७९.८८
स्पिरीट विक्रीतून - १५१.०६
शिल्लक साखर - १३४९.१२
शिल्लक मोलॅसीस - १०५.००
शिल्लक स्पिरीट - १९.२०
खर्च (लाखात)
१५ जानेवारीअखेरची बिले - ७७९.४७
तोडणी-वाहतुकीची बिले - ९१.६५
व्यापारी बिले - ८५.५१
ठेवी परत - १२८.५०
कायम कामगार पगार - ७५.५७
हंगामी कामगार पगार - २३.३५
प्रोसेस काँट्रॅक्टर बिले : २२.९०
देणी (लाखात)
ऊस बिले - १२२८.३३
तोडणी-वाहतूक बिले - २००.००
एकूण - १४२८.३३
शिल्लक - ६४.६०