गडहिंग्लज कारखाना कामगारांचे कामबंद आंदोलन अखेर मागे; 'लोकमत'मुळे मिळाले १ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 11:51 PM2023-08-05T23:51:14+5:302023-08-05T23:51:50+5:30
थकीत २६ महिन्यांचा पगार,भविष्य निर्वाह निधी,हंगामी कामगारांचे रिटेन्शन अलौऊन्स आदी मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते.
- राम मगदूम
गडहिंग्लज ( कोल्हापूर) : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ आणि साखर कामगार संघ यांच्या संयुक्त बैठकीतील सकारात्मक चर्चेतून तोडगा काढण्यात आला. त्यामुळे कामगारांनी २५ व्या दिवशी शनिवारी कामबंद आंदोलन मागे घेतले. हरळी येथे कारखान्याच्या कार्यस्थळी 'स्वाभिमानी'चे राजेंद्र गड्यान्नावर,सर्व संचालक, कामगार संघटना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. थकीत २६ महिन्यांचा पगार,भविष्य निर्वाह निधी,हंगामी कामगारांचे रिटेन्शन अलौऊन्स आदी मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते.
दरम्यान,संचालक मंडळाच्या दोन बैठकीत याप्रश्नी तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला.परंतु, आंदोलनासंदर्भात कारखान्याने औद्योगिक न्यायालयात दाखल केलेला दावा आणि ठोस आश्र्वासनअभावी कामगार आपल्या भूमिकेवर ठाम होते.त्यामुळे चर्चेतून तोडगा काढण्याची सूचना मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली होती. चर्चेत कारखान्यातर्फे अध्यक्ष डॉ.प्रकाश शहापूरकर, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, संचालक सतीश पाटील,प्रकाश पताडे, विद्याधर गुरबे यांनी तर कामगारांतर्फे संघटनेचे जनरल सेक्रेटरी अशोक मेंडूले, अध्यक्ष विजय रेडेकर,उपाध्यक्ष श्रीकांत नार्वेकर, भाऊसाहेब पाटील, अरुण शेरेगार, सुनील आरबोळे आदींनी भाग घेतला.
असा काढला तोडगा..!
- चालू हंगामापासून पगाराच्या ६० टक्के रक्कम अॅडव्हान्स स्वरूपात, उर्वरित ४० टक्के रक्कम आणि २०२१ पासूनचा थकीत पगार कारखाना नफ्यात आल्यानंतर टप्या- टप्याने देणार
- भविष्य निर्वाह निधीची थकीत रक्कम रितसर हप्ते घेऊन भरणार
- लवकरच संचालक मंडळ आणि कामगार संघटना प्रतिनिधींच्या बैठकीत समझोता करार होणार
'लोकमत'चे मानले आभार..!
११ जुलैपासूनच्या कामबंद आंदोलनासंदर्भातील सर्व घडामोडींना ठळक प्रसिद्धी देण्याबरोबरच शेतकरी,कामगार आणि कारखान्याच्या हितासाठी 'लोकमत'ने रोखठोक भूमिका घेतली. त्यामुळे संचालकांना 'मतभेद' बाजूला ठेवून पुन्हा एकत्र यावे लागले. सकारात्मक भूमिकेतून तोडगा काढून थकीत पगारापोटी १ कोटी रुपये खात्यावर जमा केल्यामुळे सर्व कामगारांनी 'लोकमत' विशेष आभार मानले.