गडहिंग्लज, इचलकरंजीत वकिलांची निषेध रॅली
By admin | Published: September 12, 2015 12:20 AM2015-09-12T00:20:03+5:302015-09-12T00:52:30+5:30
सर्किट बेंचचा प्रश्न : पूर्ततेसाठी जनरेटा वाढवू : शिंदे; न्यायमूर्ती मोहित शहा यांनी फसवणूक केल्याचा आरोप
गडहिंग्लज : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचप्रकरणी मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी जनतेची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ गडहिंग्लज अॅडव्होकेटस बार असोसिएशनतर्फे शहरातून निषेध फेरी काढण्यात आली.येथील तहसील कार्यालय व न्यायालयाच्या आवारातून फेरीला सुरुवात झाली. न्यायमूर्ती शहा यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गावर फिरून फेरी नगरपालिकेच्या प्रांगणात आली. त्या ठिकाणी सभा झाली. जनता दलाचे ज्येष्ठ नेते अॅड. श्रीपतराव शिंदे म्हणाले, कोल्हापूर खंडपीठाची मागणी फार जुनी आहे. अनेक वर्षांपासून पाठपुरावा होऊनदेखील न्याय मिळत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. सर्किट बेंचची पूर्तता न झाल्यास जनरेटा वाढवावा लागेल.यावेळी नगराध्यक्ष राजेश बोरगावे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्यान्नावर, जनता दल तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, शिवसेनेचे संग्रामसिंह कुपेकर, माजी सभापती अमर चव्हाण, श्रद्धा शिंत्रे यांची भाषणे झाली. मनसेच्या नागेश चौगुले यांनी त्याच ठिकाणी मुंडण करून घेऊन निषेध नोंदविला.
यावेळी उपसभापती तानाजी कांबळे, उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, भाजप तालुकाध्यक्ष मारुती राक्षे, सरचिटणीस अनिल खोत, जिल्हा परिषदेचे सदस्य जयकुमार मुन्नोळी, शिवप्रसाद तेली, अॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. बी. बी. घाटगे, उपाध्यक्ष अॅड. एस. व्ही. देसाई, सचिव अॅड. डी. बी. नागोंडा, अॅड. दशरथ दळवी, आदींसह महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, महिला व नागरिक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
सहा जिल्ह्यांची उद्या बैठक
इचलकरंजी : येथे इचलकरंजी बार असोसिएशनच्यावतीने मोटारसायकल रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अॅड. आर. एल. चव्हाण उपस्थित होते.
न्यायालयाच्या इमारतीपासून निघालेली मोटारसायकल रॅली शहरातील प्रमुख रस्त्यांवरून फिरविण्यात आली. यावेळी कॉँग्रेस, शिवसेना, भाजप, मराठा महासंघ, इचलकरंजी तालीम संघ, मनसे, शिवप्रतिष्ठान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मिरवणुकीचे नेतृत्व इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एस. एन. मुदगल यांनी केले. मिरवणुकीच्या सांगता सभेमध्ये अॅड. मुदगल यांनी कोल्हापूर बार असोसिएशनच्या रविवार(दि.१३)च्या सहा जिल्ह्यांच्या बैठकीस वकिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले. (प्रतिनिधी)