गडहिंग्लज बाजार समिती निवडणुकीचे पडघम
By admin | Published: November 5, 2014 12:32 AM2014-11-05T00:32:53+5:302014-11-05T00:50:11+5:30
नेत्यांकडे निर्णय : बिनविरोध होणार की रंगणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष
गडहिंग्लज -चंदगड, गडहिंग्लज, आजरा व कागल असे साडेतीन तालुके कार्यक्षेत्र असणाऱ्या गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आर्थिक अडचणीतून स्थिरस्थावर होऊ लागलेल्या या महत्त्वाच्या संस्थेची निवडणूक बिनविरोधसाठी गतवेळेप्रमाणेच सर्व नेतेमंडळी यावेळी एकत्र येणार की, सत्तासंघर्षासाठी संस्थेवर निवडणूक लादली जाणार, याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
पाच वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांचा पगारदेखील वेळेवर भागविण्याची ताकद या संस्थेत उरली नव्हती. त्यामुळेच तीनही तालुक्यांतील सर्व राजकीय पक्ष-संघटनांची मंडळी एकत्र आली. निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला. मात्र, कागल तालुक्यातील राजकीय गटबाजीचा फटका बसून अडचणीतील संस्थेला निवडणुकीस सामोरे जावे लागले. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या काही समर्थकांसह निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या बहुसंख्य उमेदवारांची माघार वेळेत होऊ शकली नाही. सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंह घाटगे यांच्यासह गडहिंग्लज विभागातील नेते एका बाजूला आणि मुश्रीफ एका बाजूला, अशी ती निवडणूक झाली. अपेक्षेप्रमाणे सर्वपक्षीय पॅनेलकडेच संस्था राहिली. मात्र, खर्चाचा बोजा संस्थेवर पडला. यावेळी कार्यक्षेत्रातील सेवा संस्था प्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, हमाल व तोलारी आणि व्यापारी मिळून सुमारे आठ हजार मतदार असणार आहेत. पाच वर्षांत जिल्ह्यासह गडहिंग्लज, आजरा, चंदगड व कागलमधील राजकीय समीकरणे बदलली. या संस्थेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.
पाच वर्षांत अशी झाली सत्तेची वाटणी...
श्रीरंग चौगुले (सभापती - श्रीपतराव शिंदे गट), लगमा कांबळे (उपसभापती - सदाशिवराव मंडलिक गट)
महादेव शिवणगेकर (सभापती - नरसिंगराव पाटील गट), बाळासाहेब शेंडुरे (उपसभापती - प्रकाशराव चव्हाण गट)
राजू पोतनीस (सभापती - जयवंतराव शिंपी गट), शेवंता होडगे (उपसभापती - राजकुमार हत्तरकी गट)
शिवाजी खोत (सभापती - बाबासाहेब कुपेकर गट), प्रकाश पुजारी (उपसभापती-नरसिंगराव पाटील गट)
अशोक चराटी (सभापती - काशीनाथ चराटी गट), चंद्रशेखर पाटील (उपसभापती - राजकुमार हत्तरकी गट)
भाजप-सेनेलाही प्रतिनिधित्वाची अपेक्षा
विद्यमान संचालक मंडळात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचा एकही संचालक नाही. मात्र,
राज्यातील सरकार बदलल्यामुळे त्यांनाही या निवडणुकीत संचालक मंडळात प्रतिनिधित्वाची अपेक्षा आहे.
गत निवडणुकीतील जागावाटप असे...
बाबासाहेब कुपेकर (४), नरसिंगराव पाटील (३), गोपाळराव पाटील (२), राजकुमार हत्तरकी (२), भरमूअण्णा पाटील (१), सदाशिवराव मंडलिक (१), विक्रमसिंह घाटगे (१), श्रीपतराव शिंदे (१), प्रकाशराव चव्हाण (१), जयवंतराव शिंपी (१), काशीनाथ चराटी (१), रवींद्र आपटे (१).