गडहिंग्लज एमआयडीसीची जागा पुन्हा 'ग्रेमॅक'च्या घशात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:16 AM2021-07-05T04:16:26+5:302021-07-05T04:16:26+5:30

राम मगदूम गडहिंग्लज : गडहिंग्लजच्या औद्योगीकरणाला खीळ घातलेल्या 'ग्रेमॅक' कंपनीकडून येथील औद्योगिक वसाहतीमधील जागा पुन्हा मिळण्याची धडपड सुरू आहे. ...

Gadhinglaj MIDC's place again in Gramac's throat? | गडहिंग्लज एमआयडीसीची जागा पुन्हा 'ग्रेमॅक'च्या घशात ?

गडहिंग्लज एमआयडीसीची जागा पुन्हा 'ग्रेमॅक'च्या घशात ?

Next

राम मगदूम

गडहिंग्लज : गडहिंग्लजच्या औद्योगीकरणाला खीळ घातलेल्या 'ग्रेमॅक' कंपनीकडून येथील औद्योगिक वसाहतीमधील जागा पुन्हा मिळण्याची धडपड सुरू आहे. किंबहुना, त्यासाठीच भूखंड वाटप बंद करून शिल्लक जागा पुन्हा 'ग्रेमॅक'च्या घशात घालण्याचा घाट असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे स्थानिक उद्योजकांत तीव्र संतापाची भावना असून 'ग्रेमॅक'चा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी उठाव होण्याची शक्यता आहे.

सन १९९८ मध्ये ‘गडहिंग्लज एम.आय.डी.सी.'ची स्थापना झाली. त्यासाठी बड्याचीवाडी-शेंद्री व औरनाळ येथील शेतकऱ्यांची १३२ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. त्यानंतर मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून छोट्या व मध्यम उद्योजकांना जागाही उपलब्ध करून दिली. २००७ मध्ये स्थानिक छोट्या उद्योजकांना स्थलांतरित करून एकमेव 'ग्रेमॅक'ला २५० एकर जागा देण्यात आली. त्यावेळी ‘८०० कोटींचा प्रकल्प आला. अडीच हजार बेरोजगारांना रोजगार मिळणार, पूरक स्थानिक व्यावसायिकांना रोजी-रोटी मिळणार,' असा मोठा गाजावाजाही केला.

परंतु, जागा मिळून तब्बल दशक उलटले तरी कोनशिला बसवून कंपाऊड बांधण्यापलीकडे कंपनीने काहीही केलेले नाही. त्यामुळे अन्य उद्योगधंदे येऊ शकले नाहीत आणि जागेअभावी काही स्थानिक उद्योजकांनाही अन्यत्र बाहेर जावे लागले.

दरम्यान, विहित मुदतीत प्रकल्प न उभारल्यामुळे औद्योगिक विकास महामंडळाने 'ग्रेमॅक'कडून जागा परत घेण्याची कार्यवाही सुरू केली. त्यावेळी न्यायालयात जाऊन जागा अडवून ठेवण्याचा प्रयत्न कंपनीने केला. परंतु, त्याला यश आले नाही. अलीकडेच 'ग्रेमॅक'कडून ही जागा काढून घेऊन त्यावर लहान-मोठे भूखंड पाडण्यात आले. अंतर्गत रस्ते व पथदिव्यांची सोय करून स्थानिक उद्योजक व्यावसायिकांना भूखंड वाटपाची प्रक्रियादेखील सुरू केली आहे.

तथापि, 'ग्रेमॅक' कंपनीने पुन्हा या ठिकाणी सुमारे १०० एकर जागेची मागणी केली आहे. त्यामुळे वाटप केलेले भूखंड वगळता उर्वरित जागा पुन्हा त्याच कंपनीला देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.

प्रतिक्रिया

'ग्रेमॅक'च्या अनुभव चांगला नाही. त्या कंपनीमुळेच गडहिंग्लजच्या औद्योगीकरणाला खीळ बसली. त्यामुळे अशा आभासी कंपनीला जागा देण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभे करावे लागेल.

- राजेंद्र गड्यान्नावर, प्रदेश सचिव, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

प्रतिक्रिया

'ग्रेमॅक्स'ला पुन्हा संधी न देता स्थानिकांनाच उद्योगविस्तारासाठी आणि नवे उद्योग उभारण्यासाठी जागा द्यावी. त्यातूनच गडहिंग्लज परिसराच्या विकासाला चालना व गती मिळेल.

- प्रकाश मोरे, उद्योजक, एमआयडीसी, गडहिंग्लज.

------------------------

फोटो ओळी : गडहिंग्लज एमआयडीसीच्या स्थापनेला तब्बल २० वर्षे उलटून गेली. तरीदेखील अद्यापही गडहिंग्लज परिसराला औद्योगीकरणाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. (आशपाक किल्लेदार)

क्रमांक : ०४०७२०२१-गड-११

Web Title: Gadhinglaj MIDC's place again in Gramac's throat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.