Kolhapur: गडहिंग्लज नगरपालिकेचा स्वच्छ सर्वेक्षणात सलग सहाव्यांदा डंका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 12:13 PM2024-01-06T12:13:35+5:302024-01-06T12:14:47+5:30
मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत विभागात दुसरी
राम मगदूम
गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ या राष्ट्रीय स्पर्धेत पश्चिम विभागात सलग सहाव्यांदा उज्ज्वल यश मिळविले. त्याचबरोबर मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेतही पुणे विभागात दीड कोटीच्या बक्षिसासह दुसरा क्रमांक पटकाविला. किंबहुना, हे दुहेरी यश म्हणजे शांतता व स्वच्छताप्रिय गडहिंग्लजकरांना नववर्षाची भेटच मानली जात आहे.
स्वच्छ सर्व्हेक्षण ही स्पर्धा देशातील पाच विभागात घेतली जाते. त्यापैकी पश्चिम विभागात गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गोवा या पाच राज्यांचा समावेश आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच नगरपालिका यशस्वी ठरल्या असून, त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील केवळ गडहिंग्लज नगरपालिकेचा समावेश आहे. ११ जानेवारीला नवी दिल्लीत या स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे.
दरम्यान, राज्य शासनातर्फे घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत शहरातील चौक सुशोभीकरण, वारसास्थळांची जपणूक, घराघरांतील विलगीकृत कचरा संकलन, प्लास्टिक बंदी, आर्थिक नियोजन व करवसुली, सार्वजनिक वाचनालय व बगीचा व्यवस्थापन, नावीन्यपूर्ण योजना, सार्वजनिक स्वच्छता व सुविधा, पाणीपुरवठा, मलजल शुद्धिकरण, हरित ब्रँड कंपोस्ट खतनिर्मिती आणि माझी वसुंधरा स्पर्धेतील यशामुळे विभागात दुसरा क्रमांक मिळाला.
याकामी प्रशासक तथा मुख्याधिकारी स्वरूप खारगे, स्वच्छता व पाणी पुरवठा अभियंता अनिल गंदमवाड, स्वच्छता निरीक्षक प्रशांत शिवणे यांच्यासह सर्व खातेप्रमुख, सफाई कामगारांनी विशेष परिश्रम घेतले.
सलग सहाव्यांदा यश
स्वच्छ सर्व्हेक्षणात गडहिंग्लज नगरपालिकेने देशाच्या पश्चिम विभागात २०१८ मध्ये ३८ वा, २०१९ मध्ये २४ वा, २०२० मध्ये ६ वा, २०२१ मध्ये ९ वा, २०२२ मध्ये ६ वा क्रमांक पटकाविला. त्याबद्दल आजअखेर तब्बल १२.५० कोटींची बक्षिसे मिळाली आहेत.
९ व १० जानेवारीला मुंबईत ‘मुख्यमंत्री सक्षम शहर’ स्पर्धेतील यशस्वी नगरपालिकांचे सादरीकरण होईल. त्यातून राज्यपातळीवरील क्रमांक मिळाल्यास गडहिंग्लजला ‘मुख्यमंत्री सक्षम शहर’ पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे मार्गदर्शन, शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळेच हे दुहेरी यश मिळाले आहे. त्याबद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन व आभार. - स्वरूप खारगे, प्रशासक तथा मुख्याधिकारी, गडहिंग्लज नगरपरिषद.