गडहिंग्लज बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:16 AM2021-06-22T04:16:35+5:302021-06-22T04:16:35+5:30
गडहिंग्लज : विनामास्कपोटी वसूल केली जाणारी पाचशेची रक्कम सामान्य माणसाला न परवडणारी आहे. त्यामुळे दंडाची रक्कम कमी करावी आणि ...
गडहिंग्लज : विनामास्कपोटी वसूल केली जाणारी पाचशेची रक्कम सामान्य माणसाला न परवडणारी आहे. त्यामुळे दंडाची रक्कम कमी करावी आणि त्या रकमेतून नागरिकांना मास्क द्यावेत, अशी मागणी गडहिंग्लज शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात कार्याध्यक्ष महेश देवगोंडा, विशाल मुधोळे, बाळासाहेब वंटमुरे, सौरभ पाटील, श्रेयस देसाई, रामनाथ दळवी, सुयोग पाटील आदींचा समावेश होता.
--------------------
२) नांगनूर ग्रामस्थांना दिलासा
गडहिंग्लज : नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील सुपर स्प्रेडर वर्गातील किराणा दुकानदार, बँक, पतसंस्था दूध संस्था कर्मचाऱ्यांच्या अॅंटिजेन तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे नांगनूर ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. डॉ. किरण माने, श्रद्धा नाईक, सौरभ रावण यांनी ही तपासणी केली.
-------------------
३) गडहिंग्लज आगारातून लांब पल्ल्याच्या फेऱ्या सुरू
गडहिंग्लज : कोरोनामुळे बंद असलेल्या लांब पल्याच्या पुणे-सोलापूर व पंढरपूर या मार्गावरील फेऱ्या गडहिंग्लज आगाराने सोमवार (२१) पासून सुरू केल्या.
गडहिंग्लज-कोल्हापूर मार्गावर दर तासाला एक गाडी सोडली जाणार आहे. दररोज रात्री ८ वाजता सुटणारी निगडी गाडीही सुरू झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक फेरीनंतर बसगाडीचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढण्यास मदत होणार आहे.
----------------------
४) गडहिंग्लजला दिव्यांग लसीकरण मोहिमेस प्रारंभ
गडहिंग्लज : १८ वर्षावरील दिव्यांगांच्या लसीकरण मोहिमेचा प्रारंभ जि. प. सदस्य हेमंत कोलेकर यांच्या हस्ते झाला. जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
येथील एम. आर. हायस्कूलमध्ये दिव्यांगांच्या लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. यावेळी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळे, डॉ. रमेश रेडेकर, संभाजी पोवार, ज्ञानदेव पाटील, मुख्याध्यापिका सरिता रजपूत आदी उपस्थित होते.