‘गडहिंग्लज’मध्ये आता शह-काटशह!
By admin | Published: December 24, 2014 10:43 PM2014-12-24T22:43:45+5:302014-12-24T22:43:45+5:30
कारण-राजकारण : गडहिंग्लज पालिकेत सभापती निवडीचा वाद
राम मगदूम - गडहिंग्लज -विषय समित्यांच्या सभापती निवडीच्या निमित्ताने गडहिंग्लज नगरपालिकेत आता शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीच्या सभापतिपदाच्या दोन उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे छाननीतच अवैध ठरवून विरोधकांनी बाजी मारली.
त्यानंतर आणखी एका समितीच्या सभापतीची निवड अवैध ठरविण्यासाठी विरोधकांनी, तर या निवडीत पीठासन अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयास स्थगिती मिळविण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी नगरपालिका संचालकांकडे धाव घेतली आहे.
तीन वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत तत्कलीन जनता दल-जनसुराज्य-काँगे्रस आघाडीचा पाडाव करून राष्ट्रवादीने पालिकेची सत्ता हस्तगत केली. १७ पैकी राष्ट्रवादीला नऊ, तर विरोधी जनता दल-जनसुराज्य -काँगे्रस आघाडीला आठ जागा मिळाल्या. काठावरील बहुमत आणि आक्रमक विरोधकांमुळे नेहमी एकमेकांना कोंडीत पकडण्याचे प्रकार सुरू आहेत.
विषय समित्यांच्या निवडणुकीत एका सदस्याने दोन समित्यांच्या सभापतिपदाच्या उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रावर अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या केल्यामुळे पीठासन अधिकाऱ्यांनी बांधकाम व वाचनालय समिती सभापतिपदाच्या उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे बेकायदेशीररीत्या अवैध ठरवून रद्द केलेल्या सभापती निवडी जाहीर कराव्यात, अशी मागणी सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अपिलातून केली आहे.
या निवडणुकीत एका सदस्याला दोन समित्यांच्या सभापतिपदाच्या उमेदवारांचे सूचक किंवा अनुमोदक होता येत नसल्यामुळे बांधकाम व वाचनालय समिती सभापतिपदाच्या उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे अवैध ठरवून पीठासन अधिकाऱ्यांनी दोनही सभापतींच्या निवडी रद्द केल्या. याच नियमानुसार महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी सुंदराबाई बिलावर यांची झालेली बेकायदेशीर निवड रद्द करावी, अशी मागणी विरोधी जनता दल-जनसुराज्य व काँगे्रस आघाडीच्या नगरसेवकांनी अपिलातून केली आहे.
राष्ट्रवादी आघाडीची अधिकृत नोंदणी झालेली नसल्यामुळे रामदास कुराडे हे सभागृहातील अधिकृत गटनेते नाहीत. त्यामुळे त्यांनी विषय समित्यांच्या निवडीत शिफारस केलेल्या सदस्यांची नावे अवैध ठरवावीत, अशी मागणीदेखील विरोधकांनी अपिलातून केली आहे.
बांधकाम व नगरविकास समिती सदस्यांच्या निवडीसाठी झालेल्या मतदानात दोन उमेदवारांच्या नावातील रेषेवर मत नोंदविण्यात आलेली शंकास्पद मतपत्रिका रद्द करावी, अशी मागणी जनसुराज्यचे नगरसेवक नरेंद्र भद्रापूर यांनी अपिलातून केली आहे.
सत्ताधारी व विरोधकांच्या अपिलांचा निर्णय कांहीही लागला तरी या अपिलांच्या पाठीमागे
शह-काटशहाचेच राजकारण असल्याचेच स्पष्ट झाले आहे.
सत्ताधाऱ्यांची मागणी
बांधकाम व वाचनालय समिती सभापती निवडीत पीठासन अधिकाऱ्यांनी दिलेला चुकीचा निर्णय रद्द करून त्या दोनही समित्यांच्या सभापतींची निवड जाहीर करावी.
विरोधकांच्या मागण्या
बांधकाम व वाचनालय समिती सभापती निवडीतील निर्णयानुसार महिला व बालकल्याण सभापतींची निवड रद्द करावी.
राष्ट्रवादी आघाडीची अधिकृत नोंदणी न झाल्यामुळे गटनेते रामदास कुराडे यांनी शिफारस केलेल्या सर्व समिती सदस्यांची नांवे अवैध ठरवावीत.