‘गडहिंग्लज’मध्ये ‘राष्ट्रवादी’त रस्सीखेच !
By admin | Published: April 19, 2015 10:10 PM2015-04-19T22:10:50+5:302015-04-20T00:12:54+5:30
जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक : संतोष पाटील, सतीश पाटील की जयकुमार मुन्नोळी ?
राम मगदूम - गडहिंग्लज -जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी गडहिंग्लज तालुक्यात ‘राष्ट्रवादी’मध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये बँकेचे माजी अध्यक्ष टी. आर. पाटील यांचे सुपुत्र संतोष पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश पाटील की, जिल्हा परिषदेचे सदस्य जयकुमार मुन्नोळी यापैकी कोण बाजी मारणार याकडेच तालुक्याचे लक्ष लागले आहे.
तालुक्यात सेवा संस्था गटात १०७ मतदार आहेत. त्यापैकी सर्वाधिक ४३ ठरावधारक राष्ट्रवादीकडेच आहेत. शक्तिप्रदर्शनासाठी प्रत्येकाने समर्थक ठरावधारक आपल्यासोबत ठेवले आहेत. खात्रीच्या विजयामुळे पक्षाच्या उमदेवारीसाठीच त्यांच्यात चढाओढ सुरू आहे.
पूर्वभागातील राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते व बँकेचे माजी अध्यक्ष कडलगेकर पाटलांनी आपला मुलगा संतोषसाठी आग्रह धरला आहे. त्याला जिल्हा परिषदेची उमेदवारी डावलण्यात आल्यामुळे बँकेची उमेदवारी कोणत्याही परिस्थितीत मिळविण्याचा चंग त्यांनी बांधला आहे.
स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या वाटचालीत त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला असून, आमदार मुश्रीफ यांच्याशीही त्यांचे निकटचे संबंध आहेत. संध्यादेवींचा आशीर्वाद मिळाल्यास उमेदवारी मिळू शकते, असे त्यांच्या समर्थकांचे मत आहे.
कागल विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झालेल्या गडहिंग्लज तालुक्यातील ‘कौलगे-कडगाव’ जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादीचे प्रमुख युवक कार्यकर्ते सतीश पाटील यांनीही उमेदवारी मागितली आहे. मुश्रीफ यांचे ते विश्वासू सहकारी आहेत. अन्य पक्ष-गटांशी त्यांचेही चांगले संबंध आहेत.
याशिवाय जिल्हा परिषदेचे सदस्य जयकुमार मुन्नोळी व शिवप्रसाद तेली यांनीही उमेदवारी मागितली असून, त्यापैकी मुन्नोळी यांचे नाव ठळक चर्चेत आहे. स्व. कुपेकर व संध्यादेवींच्या पाठीशी तेदेखील ठामपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांचा उमेदवारीसाठी आग्रह आहे. तिघा ‘निष्ठावंतां’तून एकाची निवड करताना नेत्यांची ‘कसोटी’ लागणार आहे.
प्रकाश चव्हाणांनाही उमेदवारी ?
ंगडहिंग्लज कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनीही सेवा संस्था व औद्योगिक प्रक्रिया गटातून अर्ज भरला आहे. अलीकडील राजकारणात तेदेखील मुश्रीफ व कुपेकरांच्या पाठीशी राहिले आहेत. राष्ट्रवादीच्या वाटणीच्या गडहिंग्लजला हक्काच्या दोन जागा आहेत. बँकेचे माजी संचालक भैयासाहेब हे अलीकडे राष्ट्रवादीपासून दूर आहेत. त्यांच्या जागी चव्हाण यांना उमेदवारी मिळू शकते.
विरोधकांच्या हालचालींवर लक्ष!
जिल्हा बँक निवडणुकीत गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात श्रीपतराव शिंदे, प्रकाश शहापूरकर व बाळासाहेब कुपेकर यांच्यासह काँग्रेसमधील काही गट एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यांच्यातर्फे संग्रामसिंह कुपेकर यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. त्यामुळे तोडीस तोड उमेदवार देण्याच्या दृष्टीने विरोधकांच्या हालचालीवर ‘राष्ट्रवादी’चे लक्ष आहे.