गडहिंग्लजच्या व्यापाऱ्यांचाही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 05:25 PM2020-12-07T17:25:43+5:302020-12-07T17:29:55+5:30
Bharat Bandh, Farmar, gadhinglj, kolhapurnews, traders शेतकऱ्यांच्या देशव्यापी भारत बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय येथील व्यापाऱ्यांच्या बैठकीत एकमताने झाला. त्यामुळे उद्या (मंगळवारी) अत्यावश्यक सेवा वगळून गडहिंग्लज शहरातील सर्व दुकाने दिवसभर बंद राहणार आहेत.
गडहिंग्लज : शेतकऱ्यांच्या देशव्यापी भारत बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय येथील व्यापाऱ्यांच्या बैठकीत एकमताने झाला. त्यामुळे उद्या (मंगळवारी) अत्यावश्यक सेवा वगळून गडहिंग्लज शहरातील सर्व दुकाने दिवसभर बंद राहणार आहेत.
गडहिंग्लज चेंबर आॅफ कॉमर्सच्या अध्यक्षा तथा नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. उपनगराध्यक्ष महेश कोरी, नगरसेवक नरेंद्र भद्रापूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. कोरी म्हणाल्या, देशच विकायला काढल्यासारखी परिस्थिती सध्या दिसत आहे. केंद्राच्या जनहितविरोधी कायदे व धोरणामुळे सर्वच घटकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची गरज आहे.
यावेळी हॉटेल व परमीट रूमचे अध्यक्ष अवधूत पाटील, बेकर्स असोसिएशनचे अध्यक्ष मुकूंद किनाती, नाभिक संघटनेचे संदीप झेंडे, टेलर असोसिएशनचे युनूस नाईकवाडे, कापड व्यापारी संघटनेचे प्रवीण पावले, सराफ असोसिएशनचे श्रीनिवास वेर्णेकर, पानपट्टी व्यापारी संघटनेचे भैरू गंधवाले, मेडीकल असोसिएशनचे संदीप मिसाळ, किराणा भुसार व्यापारी संघटनेचे राजेंद्र बस्ताडे, शेती सेवा केंद्र संघटनेचे अध्यक्ष रवींद्र घेज्जी यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.
गडहिंग्लजमध्ये कडकडीत बंद
रविवारी (६) भाजपा वगळता सर्वपक्ष संघटनांनी एकत्र येवून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यापाठोपाठ गडहिंग्लजच्या व्यापाऱ्यांनीही आपली दुकाने बंद ठेवून देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मंगळवारी (८) गडहिंग्लज शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळला जाणार आहे.
गडहिंग्लज येथील व्यापाऱ्यांच्या बैठकीत नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी मार्गदर्शन केले. शेजारी रवींद्र घेज्जी, युनूस नाईकवाडे, संदीप झेंडे, मुकूंद किनाती, अवधूत पाटील, राजेंद्र बस्ताडे उपस्थित होते.