गडहिंग्लज अर्बन बँक फसवणूकप्रकरणी सरव्यवस्थापकासह दोघांना कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:31 AM2021-06-09T04:31:56+5:302021-06-09T04:31:56+5:30
गडहिंग्लज : दि गडहिंग्लज अर्बन को-ऑप बँकेच्या फसवणूकप्रकरणी अटकेतील सरव्यवस्थापकासह गुंतवणूक सल्लागाराला बुधवारपर्यंत (९ जून) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश ...
गडहिंग्लज : दि गडहिंग्लज अर्बन को-ऑप बँकेच्या फसवणूकप्रकरणी अटकेतील सरव्यवस्थापकासह गुंतवणूक सल्लागाराला बुधवारपर्यंत (९ जून) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सोमवारी (७) दिला. बँकेचे तत्कालीन सरव्यवस्थापक किरण शंकरराव तोडकर (वय ५०, रा. गांधीनगर, गडहिंग्लज) व गुंतवणूक सल्लागार रूपेश काळे (वय ४२, बी-६०१, वेद महाभारत जवळ, दत्तमंदिर, गर्व्हेमेंट यार्ड, महाडीक कॉलनी, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, फंड गुरू अॅडव्हायझरीचे प्रोप्रायटर रूपेश काळे हे येथील गडहिंग्लज अर्बन बँकेचे गुंतवणूक सल्लागार म्हणून काम पाहतात. बँकेने गुंतवणुकीसंदर्भातील व्यवहाराचे अधिकार सरव्यवस्थापक तोडकर यांच्याकडे सोपवले होते.
१७ एप्रिल २०२० ते २१ मे २०२० या कालावधीत सरव्यवस्थापक तोडकर यांनी काळे यांच्याशी संगनमत करून वैयक्तिक फायद्याकरिता १३ कोटीचा अपहार करून बँकेची फसवणूक केली आहे.
२५ मे, २०२१ रोजी बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब घुगरे यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्या अर्जाच्या चौकशीअंती अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी त्या दोघांविरुद्ध रविवारी (६) रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी तोडकर व काळे यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना येथील प्रथम वर्ग न्यादंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे अधिक तपास करीत आहेत.