गडहिंग्लज अर्बन बँकेची अधिकाऱ्याकडूनच फसवूणक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:20 AM2021-06-04T04:20:24+5:302021-06-04T04:20:24+5:30
गडहिंग्लज : रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन आणि संचालक मंडळाच्या पूर्वपरवानगीशिवाय १३ कोटींची गुंतवणूक करून एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बँकेची फसवणूक ...
गडहिंग्लज : रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन आणि संचालक मंडळाच्या पूर्वपरवानगीशिवाय १३ कोटींची गुंतवणूक करून एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बँकेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी संबंधितास निलंबित करण्यात आले असून, त्या रकमेच्या वसुलीची रितसर प्रक्रिया बँकेने सुरू केली आहे, अशी माहिती दि गडहिंग्लज अर्बन को-ऑप. बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब घुगरे यांनी गुरुवारी, पत्रकार परिषदेत दिली.
बँकेच्या राखीव निधीतून संबंधित अधिकाऱ्याने केलेल्या गुंतवणुकीची आणि बँकेने सुरू केलेल्या कार्यवाहीची माहिती त्यांनी दिली. तसेच बँकेतील सर्व ठेवी सुरक्षित असल्यामुळे ठेवीदार व सभासदांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष दत्तात्रय बरगे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.
घुगरे म्हणाले, रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसारच बँकेची गुंतवणूक केली जाते. त्यासाठी सरव्यवस्थापक व लेखाव्यवस्थापक यांना अधिकार देण्यात आले आहेत. परंतु, संचालक मंडळ किंवा गुंतवणूक समितीची पूर्वपरवानगी न घेता ही गुंतवणूक करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
२०१५ पासून गुंतवणूक सल्लागार रूपेश काळे यांच्यामार्फत विविध मुच्युअल फंडात बँकेची गुंतवणूक केली जात आहे. परंतु, संबंधित अधिकाऱ्याने गतवर्षी बँकेची गुंतवणूक थेट मुच्युअल फंडात न करता काळे यांच्या वैयक्तिक फर्मवर वेळोवेळी रक्कम पाठवली आहे. त्यामुळे बँकेच्या फसवणुकीला जबाबदार धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
३१ मार्चअखेर बँकेत २४९ कोटी ४४ लाखांच्या ठेवी आहेत. १५८ कोटी ९५ लाखांची कर्जे वितरित केली असून, एकूण गुंतवणूक ८९ कोटींची आहे. ३ कोटी ३९ लाखांचा ढोबळ नफा झाला आहे. ठेवीदारांच्या ठेवींवर ५ लाखांपर्यंतचा विमा उतरविण्यात आला आहे. त्यामुळे बँक पूर्णपणे सुस्थितीत असल्याने सभासद व ठेवीदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही घुगरे यांनी केले आहे.