गडहिंग्लजला लोकवर्गणीतून लसीकरण जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:38 AM2021-05-05T04:38:02+5:302021-05-05T04:38:02+5:30
गडहिंग्लज : गडहिंग्लज पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे तालुक्यात कोरोना लसीकरण जनजागृती मोहीम राबविण्यात आली. प्राथमिक शिक्षक कलाकारांनी सहभाग ...
गडहिंग्लज : गडहिंग्लज पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे तालुक्यात कोरोना लसीकरण जनजागृती मोहीम राबविण्यात आली. प्राथमिक शिक्षक कलाकारांनी सहभाग घेऊन लोकगीतांच्या सादरीकरणातून लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले आहे. पंचायत समितीने जनजागृतीसाठी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लसीकरणाबाबत सुरुवातीला नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. त्यामुळे लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने लोकगीतांमधून लसीकरण जनजागृतीचा हा अनोखा उपक्रम राबवून आदर्श निर्माण केला आहे.
उपक्रमासाठी पुष्पाती दरेकर यांनी 'लसीकरण टाळू नका' या लोकगीताची रचना केली. शांताराम पाटील (वाघराळी), मारुती कोलूनकर (येणेचवंडी), जनार्दन पालकर (हसूरचंपू), वर्षा बुवा (हलकर्णी), संगीता जाधव (मुत्नाळ), मनोहर कोरवी (चंदनकुड), वैशाली गुरव (खमलेहट्टी), गीता मोरे (हिटणी) या शिक्षक कलाकारांनी सहभाग घेतला.
उठावदार सादरीकरणासाठी आणि ते लोकांच्या मनात रुजण्यासाठी लोकगीताला ढोलकीवादक - आंदा पाटील (गिजवणे), हार्मोनिअम वादक - अनिल बागडी (महागाव) यांनी साथ दिली. रमेश कोणुरी (खणदाळ) यांनी छायाचित्रण व ध्वनिमुद्रणाचे काम पाहिले.
याकामी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत खोत, गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हलबागोळ यांचे मार्गदर्शन लाभले.