गडहिंग्लजमध्ये दोन नगरसेवक वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:30 AM2021-09-24T04:30:02+5:302021-09-24T04:30:02+5:30
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर गडहिंग्लज शहराची हद्दवाढ झाली आहे. त्यामुळे मतदारसंख्या वाढल्याने दोन नगरसेवक वाढणार आहेत. गेल्यावेळी ८ प्रभागांत मिळून ...
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर गडहिंग्लज शहराची हद्दवाढ झाली आहे. त्यामुळे मतदारसंख्या वाढल्याने दोन नगरसेवक वाढणार आहेत. गेल्यावेळी ८ प्रभागांत मिळून नगरसेवकांची संख्या १७, तर नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट झाली होती. यावेळी हद्दवाढीमुळे नव्या प्रभागाची भर पडली आहे. त्यामुळे ९ प्रभागांत मिळून नगरसेवकांची एकूण संख्या १९ होणार आहे.
गेल्यावेळी शहराची एकूण लोकसंख्या २७१८५, तर मतदारसंख्या २१८९७ होती. यावेळी एकूण लोकसंख्या ३२६२२ झाली असून मतदारसंख्या सुमारे २७ हजाराच्या घरात असणार आहे. गेल्यावेळीप्रमाणे यावेळीही द्विसदस्यीय पद्धतीनेच निवडणूक होईल. परंतु, हद्दवाढीमुळे प्रत्येक प्रभागात १२०० ते १३०० मतदारांची भर पडेल. ८ प्रभागांत प्रत्येक २, तर नवव्या प्रभागातील नगरसेवकांची संख्या ३ मिळून सभागृहात एकूण १९ नगरसेवक असतील.
गेल्यावेळी तत्कालीन सत्ताधारी जनता दलाच्याविरोधात राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप-शिवसेना युती असा चौरंगी सामना झाला होता. त्यात नगराध्यक्षपदासह १७ जागा जिंकून जनता दलाने सत्ता अबाधित राखली होती. राष्ट्रवादीला ४, तर भाजपला २ व शिवसेनेला एक जागा मिळाली होती.
हद्दवाढीमुळे अस्तित्वात आलेल्या वाढीव प्रभागाची निवडणूक जनता दल व राष्ट्रवादी आघाडीविरुद्ध भाजप-मनसे अशी झाली. त्यात जनता दल व राष्ट्रवादीने बाजी मारली. दरम्यान, ५ वर्षांतील राजकीय स्थित्यंतरे लक्षात घेता यावेळी जनता दल विरुद्ध महाआघाडी अशा दुरंगी लढतीची असली, तरी द्विसदस्यीय निवडणुकीच्या निर्णयामुळे यावेळीदेखील पुन्हा बहुरंगी सामन्याचीच शक्यता अधिक आहे.
निवडणुकीनंतर भाजप-सेनेने सत्ताधारी जनता दलाबरोबर केलेली आघाडी ५ वर्षे कायम राहिली. परंतु, भाजपच्या दोनपैकी एकाने जनता दलात, तर दुसऱ्याने राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे सभागृहात सध्या जनता दल १३, राष्ट्रवादी ६ व शिवसेना १ असे बलाबल आहे.
गडहिंग्लज नगरपालिका : २३०९२०२१-गड-०२