सेवानिवृत्त कामगारांची देणी दिल्याशिवाय गडहिंग्लज कारखाना सुरू होऊ देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:29 AM2021-08-25T04:29:48+5:302021-08-25T04:29:48+5:30
गडहिंग्लज : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या ऑनलाइन विशेष सर्वसाधारण सभेत कोणताही ठोस निर्णय झाला नाही, त्यामुळे ...
गडहिंग्लज : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या ऑनलाइन विशेष सर्वसाधारण सभेत कोणताही ठोस निर्णय झाला नाही, त्यामुळे या सभेसंदर्भात साखर आयुक्तांकडे तक्रार करणार असून, सेवानिवृत्त कामगारांची संपूर्ण थकीत रक्कम मिळाल्याशिवाय कारखाना सुरू करू देणार नाही, असा इशारा सेवानिवृत्त साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत यांनी पत्रकार परिषदेत दिला.
शनिवारी (२१) झालेली कारखान्याची विशेष सभा सेवानिवृत्त व ७९ कामगारांचा प्रश्न आणि गेल्या २० वर्षांतील कारखान्याचा कारभार यासंदर्भात त्यांनी विवेचन केले. दरम्यान, कारखान्याचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे, उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांच्यासह आजी-माजी संचालकांवरही जोरदार टीका केली. आम्ही कोणत्याही न्यायालयात दाद मागणार नाही; परंतु लोकशाही मार्गाने रस्त्यावर आंदोलन करूनच थकीत रक्कम वसूल करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
खोत म्हणाले, नक्त मूल्य उणे असल्यामुळेच कोणतीही वित्तीय संस्था कारखान्याला कर्ज देण्यास तयार नाही. म्हणूनच जमिनीची व मशिनरीची किंमत वाढवून कारखाना नफ्यात असल्याचे दाखविण्याचा खटाटोप करून सभासद व कामगारांची दिशाभूल केली जात आहे.
२०१९-२० यावर्षीच्या ताळेबंदात व्यक्तिगत ऊस बिल देणी रक्कम ४३ लाख ६६ हजार ३६२ रुपये दाखविण्यात आली आहे. ‘एफआरपी’च्या नियमाप्रमाणे १४ दिवसांत ऊस बिले देणे बंधनकारक असतानाही ही रक्कम का दिलेली नाही, त्याचा खुलासा करावा.
औद्योगिक न्यायालयाच्या निकालासंदर्भातील स्पष्टीकरणासाठी ब्रिसक् कंपनीने उच्च न्यायालयात केलेल्या साध्या विनंती अर्जाचा बाऊ करून सेवानिवृत्त कामगारांची देणी देण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा आरोपही खोत यांनी यावेळी केला.
यावेळी सुभाष पाटील, सुरेश पाटील, लक्ष्मण देवार्डे, महादेव मांगले, अप्पासाहेब कांबळे, बाळासाहेब बडदारे, नानासाहेब चव्हाण, दिनकर खोराटे, बाळासाहेब लोंढे, राजकुमार कोकितकर, श्रीकांत रेंदाळे आदी उपस्थित होते.
चौकट :
निवडणुकीनंतर शब्द पाळला नाही
गेल्या निवडणुकीच्या वेळी श्रीपतराव शिंदे, अमर चव्हाण व सतीश पाटील यांनी महादेव मंदिरात सेवानिवृत्त कामगारांची भेट घेतली. त्यावेळी ‘आम्हाला निवडणुकीत मदत करा’, दोन महिन्यांत आपली संपूर्ण रक्कम देतो, असे आश्वासन दिले होते; परंतु त्याची पूर्तता आजअखेर झालेली नाही.
चौकट :
अध्यक्ष-उपाध्यक्षांनी खुलासा करावा
गेली २० वर्षे एकहाती सत्ता असतानाही कारखान्याला सव्वाशे कोटींचा तोटा का झाला, याचा अध्यक्ष शिंदेंनी आणि ब्रिसक् कंपनीशी झालेला करार चुकीचा आहे, असे म्हणणारे उपाध्यक्ष नलवडे यांनी त्याबाबत लवादाकडे तक्रार का केली नाही, याचा खुलासा करावा, अशी मागणी खोत यांनी केली.
------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे पत्रकार परिषदेत शिवाजी खोत यांनी सेवानिवृत्त कामगारांची व्यथा मांडली. यावेळी शिवाजी पाटील, रणजित देसाई उपस्थित होते.
क्रमांक : २४०८२०२१-गड-१०