गडहिंग्लज कारखाना बंद पडू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:17 AM2021-07-16T04:17:40+5:302021-07-16T04:17:40+5:30
गडहिंग्लज : गडहिंग्लज कारखाना स्व:बळावरच सुरू करण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच प्रसंगी चालवायला देण्याची पूर्वतयारीही करण्याचा निर्णय संचालकांनी एकमताने घेतला. परंतु, ...
गडहिंग्लज :
गडहिंग्लज कारखाना स्व:बळावरच सुरू करण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच प्रसंगी चालवायला देण्याची पूर्वतयारीही करण्याचा निर्णय संचालकांनी एकमताने घेतला. परंतु, कोणत्याही परिस्थितीत कारखाना बंद पडू द्यायचा नाही, असा निर्धार त्यांनी गुरुवारी (१५) संचालक मंडळाच्या बैठकीत केला.
हरळी (ता. गडहिंग्लज) येथे आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची बैठक अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ‘ब्रिस्क कंपनी’ने कराराची मुदत संपण्यापूर्वीच कारखाना सोडल्यामुळे येत्या हंगामात कारखाना चालू ठेवण्याबाबत सुरू असलेल्या प्रयत्नासंदर्भातील चर्चेसाठीच ही बैठक झाली. वेळेत अर्थसहाय्य उपलब्ध न झाल्यास कारखाना बंद पडून सभासद, शेतकरी व कामगारांचे नुकसान होऊ नये यासाठी कारखाना चालवायला देण्यासंदर्भातील रितसर प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला.
शिंदे म्हणाले, कारखाना सुरू करण्यासाठी किमान ५० कोटीची गरज आहे. त्यासंदर्भात कांही वित्तीय संस्थांशी चर्चा झाली आहे, येत्या ८-१० दिवसात त्याला यश येईल.
प्रकाश चव्हाण म्हणाले, नुकत्याच संपलेल्या हंगामातील सवलतीच्या दरातील साखर कंपनीकडून सभासदांना मिळणे आवश्यक असून कंपनीकडे त्याची मागणी करावी.
अर्थसहाय्य कुणाकडून उपलब्ध करणार याचा खुलासा करावा आणि त्यासंबंधीचा निर्णय संचालक मंडळातच व्हावा, अशी सूचना डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी केली. त्याला सतीश पाटील व प्रकाश पताडे यांनीही दुजोरा दिला.
चर्चेत अमर चव्हाण, बाळकृष्ण परीट, संभाजी नाईक, बाळासाहेब मोरे यांनीही भाग घेतला. क्रांतीदेवी कुराडे वगळता सर्व संचालक उपस्थित होते.
चौकट :
चर्चेतूनच मार्ग काढावा
कामगारांच्या देणीबाबत साखर आयुक्तांनी दिलेल्या आदेशाला 'ब्रिस्क'ने स्थगिती मिळविल्यामुळे आमच्या पैशांचे काय? असा सवाल कामगारांनी थेट बैठकीत जाऊन विचारला. त्यामुळे 'ब्रिस्क' आणि 'कारखाना' यांच्यातील येणी-देणी आणि कामगारांच्या देणीसंदर्भात न्यायालयातून निर्णय होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून चर्चेतूनच मार्ग काढणे सोयीचे ठरेल, अशी सूचना सतीश पाटील यांनी केली.
चौकट :
निर्णय पारदर्शकपणेच..!
आठ वर्षांपूर्वी कारखाना आर्थिक अडचणीत आला, त्यावेळी अर्थसहाय्य उपलब्ध करताना आलेल्या अडचणींचा अनुभव गाठीशी असल्यामुळे यावेळी अर्थसहाय्य करण्यासाठी तयार असलेल्या वित्तीय संस्थेचे नाव उघड करण्यास अध्यक्ष शिंदे यांनी ठाम नकार दिला. परंतु, यासंदर्भातील निर्णय पारदर्शकपणेच होईल, अशी ग्वाही उपाध्यक्ष डॉ. संग्रामसिंह नलवडे यांनी दिली.
-----------------------
फोटो गडहिंग्लज कारखाना : १५०७२०२१-गड-१०