गडहिंग्लज साखर कारखाना स्वबळावर चालविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:22 AM2021-04-18T04:22:50+5:302021-04-18T04:22:50+5:30
गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना स्वबळावर चालवण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत कार्यस्थळी झाला. अध्यक्षस्थानी कारखान्याचे ...
गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना स्वबळावर चालवण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत कार्यस्थळी झाला. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष ॲड. श्रीपतराव शिंदे होते.
२०१३-१४ पासून आर्थिक अडचणींमुळे कारखाना १० वर्षांसाठी सहयोग तत्त्वावर 'ब्रिस्क कंपनी'ला चालवायला देण्यात आला होता. परंतु, आठवड्यापूर्वी कंपनीने कराराची मुदत संपण्यापूर्वीच कारखाना सोडला आहे. त्यामुळे पुढील नियोजनासंदर्भात विचारविनिमयासाठी संचालक मंडळाची बैठक झाली. सविस्तर चर्चेअंती कारखाना स्वबळावर चालवण्याचा निर्णय झाला.
स्वबळावर कारखाना चालविण्यासाठी वित्तीय संस्थांकडून अर्थसहाय्य मिळवण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या थकहमीची गरज आहे. त्यामुळे थकहमीबरोबरच राज्य सहकारी बँक आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेण्याचे ठरले.
चर्चेत अध्यक्ष ॲड. शिंदे,
माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर, माजी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, संचालक अमर चव्हाण, सतीश पाटील, विद्याधर गुरबे आदींसह सर्व संचालकांनी भाग घेतला. संचालक दीपक जाधव, सदानंद हत्तरकी व क्रांतीदेवी कुराडे वगळता सर्व संचालक उपस्थित होते.
---------
३ वर्षांत कारखाना अडचणीतून बाहेर ..!
कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ३५०० मे.टन, डिस्टिलरीची क्षमता ३५ हजार लीटर आणि इथेनॉल प्रकल्प सुरू केल्यास कारखाना येत्या ३ वर्षांत सर्व अडचणीतून बाहेर पडेल, असा विश्वास उपाध्यक्ष डॉ.संग्रामसिंह नलवडे यांनी
यावेळी व्यक्त केला.