Kolhapur: सुंदर बसस्थानकाचा मान गडहिंग्लज, चंदगडला; एस.टी. महामंडळाने घेतली स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 04:38 PM2024-07-12T16:38:17+5:302024-07-12T16:39:15+5:30
प्रवाशांना सेवा कशी दिली जाते हा देखील निकष
कोल्हापूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सुंदर बसस्थानक अभियानात पुणे विभागाअंतर्गत घेतलेल्या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लजने दुसरा आणि चंदगड आगाराने तिसरा क्रमांक पटकाविला. गडहिंग्लजने ‘अ’ वर्ग गटात ७५ गुण मिळवून अडीच लाख रुपये, तर ‘ब’ वर्ग गटात चंदगडने ८२ गुण मिळवून दीड लाख रुपये पटकाविले.
राज्यातील एसटी महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ १ मे २०२३ ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीत राबविले. बसस्थानक व बसस्थानक परिसराचे सुशोभीकरण, आकर्षक रंगरंगोटी, मोकळ्या जागेत बागबगीचा, वृक्षरोपण, प्रवाशांसाठी बसस्थानकांवर वॉटर कूलर, घड्याळ, सेल्फी पॉइंटचे मूल्यांकन झाले. प्रवाशांना मिळणाऱ्या सेवासुविधा, बस स्वच्छता, फिटनेस बसचा विचार करून वर्षभर समितीने बसस्थानकाचे मूल्यांकन करून गुणांच्या सरासरीच्या आधारे बसस्थानकांची बक्षिसासाठी निवड झाली.
बसस्थानकाचे वर्गीकरण
प्रवासी चढ-उताराच्या संख्येवरून अ, ब, क वर्गात वर्गीकरण झाले. पहिल्या पातळीवर प्रदेशनिहाय प्रत्येक गटामध्ये तीन क्रमांक जाहीर केले. प्रत्येक प्रदेशातील प्रत्येक गटातील पहिल्या क्रमांकाच्या बसस्थानकाला राज्यस्तरावरील अंतिम फेरीसाठी निवडले. त्यातून सर्वाधिक गुण मिळवणारे बसस्थानक पहिल्या क्रमांकासाठी निवडले.
या गटांत स्पर्धा (पुणे विभाग)
‘अ’ गट : फलटण (सातारा विभाग), गडहिंग्लज (कोल्हापूर विभाग), दहिवडी (सातारा विभाग)
‘ब’ गट : अकलूज (सोलापूर विभाग), कराड (सातारा विभाग), चंदगड (कोल्हापूर विभाग)
‘क’ गट : मेढा (सातारा विभाग), औंध (सातारा विभाग), पुसेसावळी (सातारा विभाग)
आगाराला मिळालेले गुण
आगार - गुण
‘अ’ वर्ग
- फलटण ७५
- गडहिंग्लज ७५
- दहिवडी ७५
‘ब’ वर्ग
- अकलूज ८५
- कराड ८३
- चंदगड ८२
‘क’ वर्ग
- मेढा ८७
- औंध ७४
- पुसेसावळी ७०
लाखाचे बक्षीस
कोल्हापूर विभाग
गडहिंग्लज ५ लाख रुपये
चंदगड १.५ लाख रुपये
सातारा विभाग
फलटण १० लाख
दहिवडी २.५ लाख
कराड २.५ लाख
मेढा १ लाख
औंध ५० हजार
पुसेसावळी २५ हजार
सोलापूर विभाग
अकलूज ५ लाख रुपये
सर्व कर्मचार्यांनी केलेल्या सांघिक प्रयत्नांमुळे यश मिळाले आहे. सुंदर बसस्थानक झाल्याने प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. - गुरुनाथ रणे, आगारप्रमुख, गडहिंग्लज