मुश्रीफ यांच्या आश्वासनाने गडहिंग्लजकरांच्या आशा पल्लवित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:22 AM2021-01-02T04:22:00+5:302021-01-02T04:22:00+5:30
राम मगदूम। गडहिंग्लज महसूल खात्याने आपल्या नावावर करून घेतलेली प्रांत कचेरीची जागा नगरपालिकेला पुन्हा परत मिळवून देण्याचे आणि वाढीव ...
राम मगदूम।
गडहिंग्लज महसूल खात्याने आपल्या नावावर करून घेतलेली प्रांत कचेरीची जागा नगरपालिकेला पुन्हा परत मिळवून देण्याचे आणि वाढीव हद्दीतील उपनगरांच्या विकासासाठी १० कोटी देण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथील एका कार्यक्रमात केली. त्यामुळे गडहिंग्लजकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मुश्रीफ यांच्याच प्रयत्नाने पालिकेला मिळालेल्या १० कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला. प्रांत कचेरीच्या जागेवर व्यापारी संकुलाची उभारणी करून उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यास मोठी मदत होणार आहे. नगरपालिकेत आपली सत्ता नसतानादेखील मुश्रीफ यांनी गडहिंग्लज नगरपालिकेला शासनाकडून १० कोटी मिळवून दिले. जिल्हा नियोजन मंडळातून आणखी १० कोटी देण्याची ग्वाही दिली. या मदतीबद्दल माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी त्यांचे आभारही जाहीरपणे मानले.
‘युती’च्या राजवटीत प्रांतकचेरीची जागा परत मिळावी म्हणून गडहिंग्लजकरांनी काढलेल्या सर्वपक्षीय मोर्चात स्वत: मुश्रीफदेखील सहभागी झाले होते. दरम्यान, कोल्हापुरातील एका बैठकीत ‘ती’ जागा पालिकेला कदापिही परत मिळणार नाही. उर्वरित जागादेखील शासनाच्या नावावर करून घेऊ, असा दम तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालिका पदाधिकाऱ्यांना दिला होता. त्यामुळे जागा परत मिळण्याची आशा अंधूक झाली होती. परंतु, आता मंत्री मुश्रीफ यांनीच ‘शब्द’ दिल्यामुळे गडहिंग्लजकर सुखावले आहेत.
------
* नाट्यगृहाचे पाच कोटी, लक्ष्मी मंदिराचे दीड कोटी परत द्या
गडहिंग्लज कारखान्याच्या गतवेळच्या निवडणुकीत शिंदेंनी मुश्रीफांबरोबर आघाडी केल्याच्या रागातून नगरपालिकेच्या नाट्यगृहासाठी दिलेले पाच कोटी चंद्रकांत पाटील यांनी परत घेतले. देवस्थान व यात्रा समिती आणि नगरपालिका यांच्यातील वादामुळे महालक्ष्मी मंदिराचे अखर्चित दीड कोटी व कचेरी रोडवरील दर्ग्याचे ५० लाखांचा निधीही भाजप सरकारने परत घेतला. तोही मुश्रीफ यांनी परत मिळवून द्यावा, अशी गडहिंग्लजकरांची मागणी आहे. -----------------------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथील कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी शहरातील विकासकामांसंदर्भात चर्चा केली. (मज्जीद किल्लेदार) क्रमांक : ०१०१२०२१-गड-०३