गडहिंग्लजच्या संचालकांनी किमान कृतज्ञता तरी बाळगावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:24 AM2021-04-15T04:24:16+5:302021-04-15T04:24:16+5:30
गडहिंग्लज : गडहिंग्लज साखर कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात दिला आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. काही मदत लागली तर त्यांनी ...
गडहिंग्लज :
गडहिंग्लज साखर कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात दिला आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. काही मदत लागली तर त्यांनी जरूर मला भेटावे, मदत करायला मी तयार असल्याचा पुनरुच्चार करतानाच कारखान्याची सर्व देणी ब्रिस्क कंपनीने भागवली आहेत. किमान त्याबद्दल तरी कारखान्याने कंपनीप्रति कृतज्ञता बाळगली पाहिजे, अशी अपेक्षा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (बुधवारी) व्यक्त केली.
कोरोना आढावा बैठकीच्या निमित्ताने ते गडहिंग्लजला आले होते. यावेळी पत्रकारांनी गडहिंग्लज कारखान्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी हे उत्तर दिले. कारखाना व कंपनी यांच्यातील येणी-देणी संदर्भातील निर्णय सहकार खात्याचे सचिव देणार आहेत. जे योग्य असेल त्याप्रमाणे निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुश्रीफ म्हणाले, ८ वर्षांपूर्वी उसाची एफआरपीदेखील न दिल्यामुळे कारखान्याच्या संचालकांवर दोनवेळा फौजदारी झाली. कारखाना सुरू होतो की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून ब्रिस्क कंपनीला कारखाना चालवायला देण्यासाठी आपण पुढाकार घेतला; परंतु क्लोजर नोटीसमुळे प्रदूषण नियंत्रणाची व्यवस्था केली, सभासदांना दिलेली सवलतीची जादा साखर, गेट बंद आंदोलनामुळे काही कामगारांचे फिटमेंट करावे लागले. दबावापोटीच्या या गोष्टींमुळे कंपनीला जादाचा खर्च करावा लागला. म्हणूनच कंपनीने मुदतीपूर्वी कारखाना सोडला आहे.
-----------------------
* संचालकांचा अजब शोध..!
आपल्या कार्यकाळातील सेवानिवृत्तांची देणी देण्यास कंपनी तयार आहे; परंतु कारखान्याच्या कार्यकाळातील सेवानिवृत्तांची देणीसुद्धा कंपनीनेच द्यावीत, असा अजब शोध संचालकांनी लावला आहे, अशी टिपणीदेखील मुश्रीफांनी यावेळी केली.
-----------------------
* हसन मुश्रीफ : १४०४२०२१-गड-०९