गडहिंग्लजची काळभैरी यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:34 AM2021-02-26T04:34:58+5:302021-02-26T04:34:58+5:30
गडहिंग्लज : गडहिंग्लजचे ग्रामदैवत सीमाभागांचे आराध्यदैवत श्री काळभैरवाची यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती प्रांताधिकारी विजया पांगारकर ...
गडहिंग्लज : गडहिंग्लजचे ग्रामदैवत सीमाभागांचे आराध्यदैवत श्री काळभैरवाची यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी दिली. पत्रकार परिषदेत पोलीस उपधीक्षक गणेश इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पांगारकर म्हणाल्या, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन यावर्षी काळभैरव यात्रा रद्द केली आहे. मंदिरापासून १ किलोमीटर परिसरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मोजक्याच मानकरी व पुजाऱ्यांच्या उपस्थितीत केवळ धार्मिक विधी पार पडतील. दर्शनासाठी मंदिर खुले बंद राहणार आहे.
इंगळे म्हणाले, गडहिंग्लजच्या सुसंस्कृतपणा जपण्यासाठी यावर्षी नागरिकांनी घरी राहूनच यात्रा साजरी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे.
रविवार (२८) पासून शुक्रवार (५) पर्यंत मंदिर परिसरात प्रवेश बंदी राहणार आहे. काळभैरीमार्गे असणारी वाहतूक पर्यायी वडरगे, कडगाव आणि शेंद्री या मार्गावरून सुरू राहील. पालखी सोहळा व मिरवणूक न काढता पालखीचे पूजन झाल्यानंतर ट्रकमधून पालखी डोंगरावरील मंदिरात नेण्यात येईल. सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून खबरदारी घेऊन धार्मिक विधी पार पाडण्याचे आवाहनही पांगारकर यांनी यावेळी केले.
यावेळी तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड आदी उपस्थित होते.