गडहिंग्लजची ‘लोकशिक्षण व्याख्यानमाला’ हेरिटेजमध्ये !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:51 AM2021-09-02T04:51:45+5:302021-09-02T04:51:45+5:30
तब्बल ४० वर्षांची परंपरा लाभलेल्या येथील पू. साने गुरुजी सार्वजनिक मोफत वाचनालयाच्या ‘लोकशिक्षण व्याख्यानमालेसह शहरातील तहसील कचेरी, पोलीस ठाणे ...
तब्बल ४० वर्षांची परंपरा लाभलेल्या येथील पू. साने गुरुजी सार्वजनिक मोफत वाचनालयाच्या ‘लोकशिक्षण व्याख्यानमालेसह शहरातील तहसील कचेरी, पोलीस ठाणे आणि कोर्टाची जुनी इमारत, बॅ. नाथ पै. विद्यालय, एम. आर. हायस्कूल, काळू मास्तर विद्यालय आणि महालक्ष्मी मंदिर व महादेव मंदिर आदी वास्तूंचा हेरिटेजमध्ये समावेश करण्याचा निर्णय गडहिंग्लज नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने झाला.
नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. जिल्हा हेरिटेज कॉन्झर्वेशन समितीच्या सूचनेनुसार तयार करण्यात आलेली शहरातील इमारतींची वारसा यादी मंजुरीसाठी नगररचना विभागाकडे पाठविण्यास सभेत मंजुरी देण्यात आली.
स्थायी निर्देशानुसार सफाई कामगार व मजुरांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या वारसांना संधी द्यावी आणि हद्दवाढीमुळे कर्मचारी संख्या अपुरी पडत असल्याने नवीन आकृतिबंध मंजुरीसाठी पाठविण्याची सूचना हारुण सय्यद यांनी केली. त्यावर नवीन आकृतिबंध करण्याचे काम शासन पातळीवर सुरू असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिकेवर यापूर्वीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घ्यावा लागतात. त्यासाठी कर्मचाऱ्यांनाच पाठवण्याऐवजी आस्थापना विभागाने त्याची पूर्तता करून घ्यावी, अशी सूचना सय्यद यांनी केली.
चर्चेत दीपक कुराडे यांनीही भाग घेतला. प्रारंभी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गेल ऑम्वेट, बांधकाम सल्लागार आनंद कुलकर्णी यांना आदरांजली वाहण्यात आली. मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली.
चार्जिंग स्टेशनसाठी करात सूट
इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी शहरात चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या नागरिकांना २ टक्के आणि गृहनिर्माण संस्था-सोसायट्यांना ५ टक्क्यापर्यंत मालमत्ता करात सूट देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी मुतकेकर यांनी दिली.
-----------------
गडहिंग्लज नगरपालिका : ३१०८२०२१-गड-१०