गडहिंग्लज पालिकेत पुन्हा ‘मानापमान’ नाट्य !

By admin | Published: August 4, 2015 12:18 AM2015-08-04T00:18:52+5:302015-08-04T00:18:52+5:30

केबीन काढून घेऊन अपमान : चौगुले

Gadhinglaj's play again 'Manapaman' drama! | गडहिंग्लज पालिकेत पुन्हा ‘मानापमान’ नाट्य !

गडहिंग्लज पालिकेत पुन्हा ‘मानापमान’ नाट्य !

Next

गडहिंग्लज : सत्ताधारी कारभाऱ्यांनी उपनगराध्यक्षांची केबीन काढून घेऊन आपला अपमान केला आहे. ‘अँटीचेंबर’च्या नावाखाली आपल्या कार्यकर्त्यांना बसण्याची व्यवस्था करून पक्षीय राजकारणासाठी त्या केबीनचा वापर केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले यांनी केला आहे.पालिकेत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांसाठी स्वतंत्र केबीन होते. सत्ताधारी जनता दल-जनसुराज्य-काँगे्रस आघाडीच्या नगराध्यक्षांनी स्वतंत्र केबीन बंद करून आपल्या केबीनमध्येच उपनगराध्यक्षांच्या बसण्याची व्यवस्था केली आहे. त्याचे पडसाद आज उमटले.
उपनगराध्यक्षा चौगुलेंनी पत्रकारांसमोर आपली प्रतिक्रिया लेखी मांडली. पालिकेचा कारभार व्यक्तिद्वेष व पक्षीय राजकारणातून सुरू असल्याचा आरोप करून सत्ताधाऱ्यांच्या या कृतीचा त्यांनी निषेध नोंदविला.
पत्रकात म्हटले आहे, २२ जुलै २०१५ रोजीच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्षांच्या शेजारी असणारी उपनगराध्यक्षांची बैठक व्यवस्था बदलून नगराध्यक्षांनी पालिकेतील १२५ वर्षांची परंपरा मोडीत काढली. विरोधी उपनगराध्यक्षा शेजारी बसल्यामुळे आपल्याला त्रास होतो असे म्हणणाऱ्या नगराध्यक्षांना आता आपल्या बाजूला उपनगराध्यक्षांची खुर्ची कशी चालते?
यापूर्वीही विद्यमान नगराध्यक्षांचे वर्तन सभागृहातही असेच होते. त्यांच्या गटनेत्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यामुळे तत्कालीन नगराध्यक्षांनी त्यांच्यावरील कारवाई थांबवली. नगराध्यक्ष निवडीवेळी महिला नगरसेवकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत त्यांची मजल गेली. नगराध्यक्षांच्या दालनामध्ये बैठकीची व्यवस्था न करता अन्य सभापतींसाठी ज्याप्रमाणे वेगळेवेगळे कक्ष आहेत, त्याप्रमाणे उपनगराध्यक्षा तथा आरोग्य व पाणीपुरवठा सभापतींसाठी स्वतंत्र केबीन असते हे बहुधा नगराध्यक्षांना माहीत नसावे, असा टोमणाही लगावण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते रामदास कुराडे, नगरसेविका मंजूषा कदम, लक्ष्मी घुगरे व हारूण सय्यद उपस्थित होते. (प्रतिनिधी)


‘दालना’त बसवून सन्मानच : बोरगावे
गडहिंग्लज : सव्वाशे वर्षांपासून नगराध्यक्षपद व उपनगराध्यक्षांच्या बैठकीची व्यवस्था एकाच दालनात आहे. मात्र, साडेतीन वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या ‘राष्ट्रवादी’नेच दोघांच्या बैठकीची व्यवस्था स्वतंत्र केली होती. पुन्हा आपण आपल्या दालनातच बैठकीची व्यवस्था करून उपनगराध्यक्षांचा सन्मानच केला आहे. त्यामुळे स्टंटबाजी थांबवून शहराच्या विकासासाठी त्यांनी आपल्याबरोबर काम करावे, असा टोला नगराध्यक्ष राजेश बोरगावेंनी उपनगराध्यक्षा चौगुलेंना हाणला.
नगराध्यक्ष बोरगावे यांनीही पत्रकार परिषदेत आपल्यावरील आरोपांचे खंडन केले. गटनेत्या प्रा. स्वाती कोरींसह सत्ताधारी नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
बोरगावे म्हणाले, उपनगराध्यक्षांची केबीन काढून अँटीचेंबर वगैरे केलेले नाही. ‘स्वतंत्र केबीन’ची व्यवस्था करून त्यांच्या आघाडीनेच मोडलेली पदाधिकाऱ्यांच्या एकत्र बसण्याची परंपरा पुन्हा सुरू केली आहे.
विरोधक असतानाही स्वतंत्र न बसविता आपल्यासोबत बसण्याची व्यवस्था करून त्यांनाही कारभारात सहभागी करून घेत आहोत. शहराच्या विकासासाठी आपल्यासोबत काम करण्याची विनंती आम्ही उपनगराध्यक्षांना करीत आहोत.
यापूर्वीदेखील सव्वा दोनवर्षे नगराध्यक्ष म्हणून आपण काम केले आहे. पालिकेच्या कारभाराचा आपल्याला चांगला अनुभव आहे. उपनगराध्यक्षांनीही आपल्या अनुभवाचा फायदा घ्यावा, असा टोलाही बोरगावेंनी लगावला.
सत्ताधारी व विरोधक असा भेदभाव न करता उपनगराध्यक्षांच्या बैठकीची व्यवस्था नगराध्यक्षांनी आपल्या दालनात केली
आहे. त्याचे स्वागत केले पाहिजे. ५० लाखांचे आमिष दाखविल्याचा आरोपही खोटा
आहे त्यांनी तो सिद्ध करावा, अन्यथा
आम्ही त्यांच्यावर अबू्रनुकसानीचा दावा ठोकू, असा इशाराही प्रा. कोरींनी यावेळी
दिला.
यावेळी नगरसेवक बसवराज खणगावे, बाळासाहेब वडर, उदय पाटील व सुंदराबाई बिलावर उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)


दोघांचीही नार्को टेस्ट करावी
गेल्या नगराध्यक्ष निवडीवेळी चौगुले यांनीच चारवेळा फोन करून आम्हाला त्यांच्या माहेरी कोण्णुर येथे बोलवून घेतले होते. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असणाऱ्या माझ्या बहिणीला पाडूया व मुश्रीफांची सत्ता उलथवून टाकूया, असे त्यांनीच आम्हाला सांगितले होते. वैयक्तिक आरोपावरून आपण सभागृहात याचा गौप्यस्फोट केल्यामुळेच त्या ५० लाखांच्या आमिषाचा खोटा आरोप करीत आहेत. गडहिंग्लजकरांना ‘सत्य’ समजण्यासाठी दोघांचीही नार्को टेस्ट करावी, मी त्यासाठी तयार आहे, असे बोरगावेंनी यावेळी स्पष्ट केले.

५० लाखांच्या आमिषाचा आरोप
गेल्या नगराध्यक्ष निवडीच्यावेळी हीच मंडळी मला ५० लाखांचे आमिष दाखविण्यासाठी माझ्या माहेरी आले होते. असे असतानाही गेल्या सर्वसाधारण सभेत त्यांनी माझ्यावर बिनबुडाचा आरोप केला. पैशासाठी राजकारण करायचे असते तर मैत्रिणीला डावलून यांना सत्तेवर आणले असते. पण, मी मैत्री जपणारी मैत्रीण आहे हे त्या भावाला दाखवून दिले आहे, असा आरोपही चौगुलेंनी बोरगावे यांच्यावर केला आहे.

Web Title: Gadhinglaj's play again 'Manapaman' drama!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.